या महादेवाच्या पिंडीवर वाहिले जातात जिवंत खेकडे

भारतात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. देशात शिवमंदिरांची संख्या तर लाखोंनी आहे आणि त्यातील अनेक शिवमंदिरे खास, रहस्यमयी आहेत. आपल्याला माहिती आहे, सर्वसाधारण पणे शिवमंदिरात पिंडीवर जलाभिषेक, दुध, बेल पाने, फुले वाहिली जातात. पण गुजरातच्या सुरत मधील रामनाथ शिवमंदिरात मात्र शिवपिंडीवर जिवंत खेकडे वाहण्याची प्रथा आहे आणि ही प्रथा फार पुरातन काळापासून चालत आली आहे.

या मागची कथा मोठी रोचक आहे. त्याचा संबंध थेट रामायणाशी जोडलेला आहे. असे सांगतात श्रीराम येथून समुद्र पार करत होते तेव्हा त्यांच्या पावलावर खेकडा आला. रामाला खेकडा पाहून नवल वाटले, त्यांनी तो खेकडा उचलून घेतला आणि त्याला आशीर्वाद दिला कि, या शिवमंदिरात पूजेत खेकडा असणे अनिवार्य बनेल. इतकेच नव्हे तर जो कुणी भक्त शिवपिंडीवर जिवंत खेकडा वाहून प्रार्थना करेल त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तेव्हापासून शिवपिंडीवर खेकडा वाहण्याची प्रथा सुरु झाली आहे. मात्र फक्त मकरसंक्रांतिच्या दिवशीच ही प्रथा पाळली जाते.

शिवपिंडीवर जिवंत खेकडा वाहिला तर सौभाग्य आणि भाग्य दोन्हीची प्राप्ती होते तसेच सर्व प्रकारच्या आरोग्य समस्या निराकरण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. शिवपिंडीवर वाहिलेले हे खेकडे नंतर एकत्र केले जातात आणि पुन्हा समुद्रात सोडले जातात असे सांगितले जाते.