मांजरामुळे आठ तास बत्ती गुल, १०० कोटींपेक्षा अधिक नुकसान
पुण्याजवळील पिंपरी चिंचवड या उद्योगनगरीत एक हैराण करणारी घटना घडली आहे. एका मांजरामुळे आठ तास वीज बंद होण्याची आणि त्यामुळे सुमारे १०० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याची चर्चा होऊ लागली आहे. पिंपरी चिंचवडच्या महापारेषण पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या आत एक मांजर अडकली त्यामुळे ऐन उन्हाळ्यात ८ तास वीजपुरवठा बंद पडला. पिंपरी चिंचवड हे भारतातील मोठे ऑटो हब म्हणून ओळखले जाते.
येथील एमआयडीसी मध्ये लहान मोठी ७५०० हून अधिक उत्पादन युनिट आहेत. वीज पुरवठा बंद झाल्याने आठ तास उत्पादन ठप्प झाल्याने १०० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. विजेच्या झटक्याने मांजराचा मृत्यू झाला पण आत अडकलेले मांजर बाहेर काढून वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यास महावितरण अधिकाऱ्याना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार २२० केव्ही सबस्टेशन मध्ये १०० एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास मांजर शिरल्याने बिघाड झाला आणि त्यामुळे १० वाहिन्या बंद केल्या गेल्या. त्यात भोसरीच्या एमआयडीसी सह अन्य भागातील ४५०० औद्योगिक युनिट बंद पडली. आकुर्डी भागाचा वीजपुरवठा सुद्धा बंद पडला. त्यामुळे उत्पादन होऊ शकले नाही. पुणे शहरात सुद्धा गुरुवारी सकाळी एक मांजर ३० फुट उंचीच्या टॉवरवर चढले होते पण फायरब्रिगेडच्या जवानांनी मांजराची सुखरूप सुटका केली असे समजते.