चीन मध्ये लग्न करण्यास युवा वर्ग अनुत्सुक

दोन वर्षाच्या करोना संकटातून पार पडल्यावर यंदाच्या लग्नसिझन मध्ये अमेरिकेत विक्रमी २६ लाख विवाह होऊ घालते असताना चीन मध्ये मात्र गतवर्षीच्या तुलनेत गेल्या ३६ वर्षात सर्वात कमी विवाह नोंदविले जात आहेत. जपान, कोरिया प्रमाणेच चीनला सुद्धा घटत्या जन्मदराची समस्या भेडसावू लागली आहे. त्यामुळे सरकार कडून अनेक प्रोत्साहन पर योजना लागू केल्या आहेत पण त्याचा फारसा परिणाम झालेला नाही असे अनुभवास येते आहे. चीन मधील लग्न वयाची मुले मुली विवाह करण्यास उत्सुक नाहीत.

नागरी मंत्रालयाच्या आकडेवारी वरून दिसून येते कि गतवर्षी चीन मध्ये ७६ लाख विवाह नोंदले गेले तर २०२० मध्ये ८१.३ लाख विवाह नोंदण्या झाल्या. म्हणजे एका वर्षातच विवाह संख्या ५ लाखापेक्षा अधिक घटली. यामागे मुख्य कारण नोकऱ्या मिळणे अवघड झाल्याने कुटुंबाचा खर्च कसा परवडणार असा प्रश्न युवकांना सतावतो आहे. अनेकाना नियमित इन्कम नाही. महिला सुद्धा याच कारणाने विवाहास उत्सुक नाहीत.

चीन मध्ये केवळ कार्यालयातूनच नाही तर घरातही महिला पुरुष समानता वाढली आहे. त्यामुळे चांगली कमाई करणाऱ्या मुली विवाह करण्यास तयार नाहीत. उलट करोना काळात घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या वेगाने वाढली आहे. २०२१ मध्ये २१.४ लाख जोडप्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे सांगितले जात आहे. महिला सबलीकरण वाढल्याने महिला अधिक शिक्षण घेऊन स्वावलंबी होत आहेत आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र मिळत असल्याने विवाह बंधनात अडकणे त्या टाळतात असेही दिसून येत आहे.