नोटीस आल्यावर अमिताभ बच्चन यांनी भरला १.०९ कोटी जीएसटी

गुड्स सर्व्हिस टॅक्स म्हणजे जीएसटी विभागाकडून नोटीस मिळाल्यानंतर बॉलीवूड शेहेनशहा अमिताभ बच्चन यांनी १.०९ कोटीचा कर जमा केला आहे. गतवर्षी नोव्हेंबर मध्ये त्यांनी लिलावातून ७.१५ कोटीं किमतीचे नॉन फंजीबल टोकन (एनएफटी) विक्री केले होते. पण त्यावर जीएसटी भरला नव्हता. त्यामुळे डायरेक्टर जनरल जीएसटी तर्फे बच्चन यांना नोटीस पाठविली गेली होती. अर्थात बिग बीनी जीएसटी भरला असला तरी त्यांच्या अडचणी अजून संपल्या नाहीत असे सांगितले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डीजीसीआय करचुकवेगिरीचा तपास सुरु ठेऊ शकते.

एनएफटीवर लिलावात अमिताभ बच्चन यांनी वडील हरिवंशराय बच्चन यांचा अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय कविता संग्रह ‘मधुशाला’ मधील कविता स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून त्याची विक्री केली होती. या शिवाय पोस्टर, फोटो यांचीही विक्री केली होती आणि त्यातून ७.१५ कोटींची कमाई केली होती. त्यावर १८ टक्क्यांनी जीएसटी भरावा लागणार होता.

एनएफटी हि डिजिटल संपत्ती मानली जाते आणि प्रत्यक्ष जगासमोर वस्तू, पेंटिंग, फोटो, म्युझिक, व्हिडीओ व अन्य वस्तूंचे प्रतिनिधित्व करते. डिजिटल लेझरवर हा डेटा संग्रहित केला जातो त्याला ब्लॉकचेन म्हटले जाते. अमिताभ यांनी त्यांचा संग्रह सिंगापूर स्थित बियोंड लाईफ क्लब तर्फे या प्लॅटफॉर्मवर सादर केला होता. त्यासाठी त्यांनी रिती एन्टरटेनमेंट प्रा.लिमी. सोबत करार केला होता. आजपर्यंत अनेक बॉलीवूड कलाकारांनी एनएफटी प्लॅटफॉर्मवर आपल्या वस्तू विकून प्रचंड कमाई केली आहे. त्यात सलमान खान, डीझायनर मनीष मल्होत्रा, क्रिकेटर झहीर खान, ऋषभ पंत यांचा समावेश आहे.