विराट कोहलीची या स्टार्टअप मध्ये गुंतवणूक

टीम इंडियाचा माजी कप्तान विराट कोहली आता उद्योजक बनला आहे. त्याने कॉफी उद्योगात पाउल टाकले आहे. अर्थात या पूर्वी अनेक क्रिकेटर्सनी विविध उद्योगात गुंतवणूक केली आहेच. विराटने डबाबंद कॉफी उत्पादन स्टार्टअप ‘रेज कॉफी’ मध्ये भागीदारी घेतली आहे असे कंपनीने जाहीर केले आहे.

रेज कॉफीने विराटला त्यांच्या उत्पादनासाठी ब्रांड अँबेसिडर केल्याची घोषणा सुद्धा केली आहे. म्हणजे विराट आता या कंपनीत भागीदार आहेच पण तो कंपनीच्या उत्पादनांची जाहिरात सुद्धा करणार आहे. कंपनीचे मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही बाजारात कंपनीची उपस्थिती आहे. रेज कॉफीने बुधवारी विराटने कंपनीत गुंतवणूक केल्याचे जाहीर केले आहे मात्र ही गुंतवणूक किती आहे याचा खुलासा केलेला नाही.

कंपनी चालकांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन गुंतवणुकीचा वापर देशभर व्यवसाय विस्तार करण्यासाठी तसेच मार्केटिंग, वितरण, उत्पाद वाढ, नवीन उत्पादनांच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी कार्यक्षम लोकांना जोडून घेणे यासाठी केला जाणार आहे. यापूर्वी रेज कॉफीने सिक्स्थ सेन्स व्हेन्चरच्या मदतीने गतवर्षी ५० लाख डॉलर्सची पुंजी गोळा केली आहे असे समजते.