युद्धखोर रशियात कंडोमला प्रचंड मागणी, किंमती भडकल्या
युक्रेन बरोबर युद्ध सुरु करून रशियाने युद्धखोर देश म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. या युद्धाला २७ दिवस उलटले तरी यातून नक्की काय निकाल लागणार याचा अंदाज आलेला नाही. मात्र रशियात या काळात कंडोम विक्री प्रचंड प्रमाणात वाढली असून गेल्या महिन्यात या विक्रीत १७० टक्के वाढ नोंदविली गेली आहे. रशियात सध्या कंडोमची टंचाई जाणवू लागल्याने त्यांच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत. परिणामी कंडोमचे रेशनिंग करण्याची पाळी रशियावर आल्याचे सांगितले जात आहे.
युक्रेन विरुध्द लष्करी कारवाई केल्याने रशियावर जगातील अनेक देशातील बड्या कंपन्यांनी बहिष्कार घातला आहे. त्यात कंडोम कंपन्या सुद्धा सामील आहेत. ब्रिटीश कंडोम कंपनी रेकीटने रशियातील त्यांचा व्यवसाय अजून सुरु ठेवला आहे पण तो कधी बंद होईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे भविष्यात कंडोमची टंचाई वाढण्याची भीती रशियन नागरिकांना वाटते आहे. त्यामुळे नागरिक कंडोमची साठवण करू लागले आहेत.
एका ब्रिटीश वार्तापत्राने दिलेल्या बातमीनुसार नको असलेले गर्भारपण टाळण्यासाठी प्रामुख्याने कंडोमचा वापर अधिक केला जातो. कंडोम टंचाई मुळे कुटुंब नियोजन अडचणीत येईल अशी भीती आहे. त्यामुळे धोका पत्करण्यापेक्षा कंडोम खरेदी करून ठेवण्यास रशियन प्राधान्य देत आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कंडोम विक्रीत १७० टक्के वाढ झाली आहेच पण पाश्चात्य देशांच्या चलनाच्या तुलनेत रशियन रुबल घसरल्याने कंडोमच्या किमती सुद्धा प्रचंड वाढल्या आहेत.