टेस्लाला टक्कर देणार ट्रायटन, गुजराथेत उभारणार उत्पादन प्रकल्प
इलेक्ट्रिक कार्स साठी जगभरातून मागणी वाढत आहे आणि आज तरी इलेक्ट्रिक कार म्हटले कि चटकन नाव पुढे येते टेस्लाचे. टेस्ला भारतात कधी येणार हे अजून गुपित असले तरी टेस्लाला टक्कर देण्यासाठी गुजराथी अमेरिकन उद्योजक हिमांशू पटेल सज्ज झाले आहेत. मूळचे गुजराथी असलेले हिमांशू त्यांच्या अमेरिकन बेस्ड ट्रायटन इलेक्ट्रिक कार्स आणि ट्रकचे उत्पादन गुजराथ मध्ये करणार आहेत. गुजराथ सरकार आणि ट्रायटन मध्ये ४ एप्रिल रोजी या संदर्भातला करार केला जाणार आहे.
हिमांशू या संदर्भात म्हणाले, आमचे भारतातले पहिले उत्पादन केंद्र गुजरात मध्ये सुरु होत असून त्यासाठी ६०० एकर जागा घेतली गेली आहे. त्यात ३० लाख चौरस फुटाचा अत्याधुनिक प्रकल्प उभारला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या टीमसह गुजरातला भेट दिली आणि मुख्यमंत्री भूपेद्र पटेल यांच्याशी चर्चा केली होती. या प्रकल्पात इलेक्ट्रिक कार्स बरोबरच ट्रक पण तयार केले जातील.
पटेल म्हणाले उत्पादन प्रकल्पाबरोबरच आम्ही इलेक्ट्रिक वाहन नेटवर्क स्थापन करणार आहोत. लवकरच बॅटरी उत्पादक, ऑटो पार्ट उत्पादक, चार्जिंग स्टेशन निर्माते यांच्याशी चर्चा सुरु केली जात आहे. कंपनीच्या वेबसाईटनुसार ट्रायटन इलेक्ट्रिक कार्स, ट्रक व डिफेन्स साठी वाहने बनविते.
जून २०२१ मध्ये हा उत्पादन प्रकल्प तेलंगाना मध्ये उभारण्यासाठी बोलणी झाली होती पण काही कारणाने ती पुढे जाऊ शकली नाहीत. येथे २००० कोटींची गुंतवणूक केली जाणार होती आणि त्यामुळे २५ हजार नवे रोजगार निर्माण होणार होते. आता ही संधी गुजराथला मिळाली आहे. हिमांशू पटेल गेली १५ वर्षे अमेरिकेत इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रोनिक वाहन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी ट्रायटन सोलर व इव्ही अश्या दोन कंपन्या स्थापन केल्या आहेत त्यात सोलर पॉवर व इलेक्ट्रिक वाहनाचे उत्पादन केले जाते.