राज्य मार्गांवर दर २५ किमीवर होणार इव्ही चार्जिंग स्टेशन

देशात इलेक्ट्रिक वाहनाची मागणी वेगाने वाढत आहे आणि केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठीं अनेक योजना कार्यान्वित करत आहे. त्यासाठी कसून प्रयत्न केले जात आहेत. अवजड उद्योग मंत्रालयाने ‘फेम इंडिया’ योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ६८ शहरात २८७७ चार्जिंग स्टेशन्स उभारण्यास मंजुरी दिली आहे. शिवाय १६ राज्यमार्ग आणि ९ एक्स्प्रेस वेवर इव्ही चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. राज्यमार्गांच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी २५ किमीवर एक स्टेशन असेल.

राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूना दर १०० किमीवर दीर्घ अंतर कापू शकणाऱ्या किमती इलेक्ट्रिक वाहनासाठी एक चार्जिंग स्टेशन असेल. शहरात ३ बाय ३ किमी ग्रीड मध्ये एक स्टेशन उभारले जाणार आहे. फेम योजनेचा मुख्य उद्देश हायब्रीड व इलेक्ट्रिक कार्स, दुचाकी, तिचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीस प्रोत्साहन देणे हा आहेच पण त्यासाठी आवश्यक चार्जिंग पायाभूत सुविधा पुरविणे, पर्यावरण, प्रदूषण व इंधन बचत असेही हेतू त्यातून साध्य केले जाणार आहेत.

फेम दोन योजनेसाठी १० हजार कोटींचे बजेट असून ही योजना २०१९ एप्रिल मध्ये सुरु झाली आहे. त्यानुसार भारत सरकार ५५ हजाराहून अधिक प्रवासी वाहने, १ लाख इलेक्ट्रिक दुचाकी, ५ लाख थ्री व्हीलर, ७ हजार ई बसना सबसिडी देणार आहे. सबसिडी साठी दुचाकीची रेंज सिंगल चार्ज मध्ये ८० किमी व सर्वाधिक स्पीड ४० किमी असणे आवश्यक केले गेले आहे.