सट्टे बाजाराची पंढरी ‘फालोडी’ बनले सर्वाधिक तप्त  गाव

राजस्थानातील फालोडी हे गाव सट्टेबाजाचे गाव म्हणून देश विदेशात प्रसिद्ध आहे. येथे आज पाउस पडेल का, पडला तर किती जोराचा पडेल इथपासून क्रिकेट,आयपीएल, निवडणूक निकाल असे सर्व प्रकारचे सट्टे लावले जातात आणि गावातील जवळजवळ प्रत्येक नागरिक त्यात सहभागी होतो. अन्य उद्योग करताना सट्टा हा येथील नागरिकाचा जोड उद्योग म्हटले तरी गैर ठरणार नाही. आता फालोडी आणखी एका विक्रमासाठी देशात प्रसिद्धीस येऊ लागले आहे. देशातील सर्वात गरम गाव अशी त्याची ओळख बनली असून मार्च च्या सुरवातीपासून येथे उष्णतेचा पारा ४० च्या वर गेला आहे. सकाळपासूनचा उन्हाच्या झळा जाणवत असून मे जून मधील तापमान ५१ डिग्रीवर जाऊ लागले आहे.

जोधपुर जिल्ह्यातील हे छोटे गाव २०१६ मध्ये अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले. तेव्हा येथील तापमानाने ५१ डिग्रीची नोंद केली. प्रसिद्ध थार वाळवंटाला लागून असलेले हे गाव उन्हाळ्यात अति गरम आणि थंडीत अति थंड असते. थार वाळवंटाचा ८० टक्के भाग भारतात तर २० टक्के पाकिस्तान मध्ये आहे. फालोडीच्या आसपास बिकानेर, जेसलमेर, नागौर अशी मोठी शहरे आहेत.

फालोडी हे प्राचीन गाव आहे. १२३० मध्ये कल्याण रावजी मंदिर येथे बांधले गेले आणि १४ व्या शतकात येथे अनेक इमारती, दुकाने, विहिरी बांधल्या गेल्या असे सांगतात. १८४७ मध्ये जैन तीर्थ पारसनाथ मंदिर उभे राहिले आणि त्यात त्या काळात बेल्जियम काचेचा वापर केला गेला होता. आज हे गाव औद्योगिक विकासाचे केंद्र असून मिठाचा मोठा पुरवठा या भागातून देशाला केला जातो. येथील प्लास्टर ऑफ पॅरीस फार प्रसिद्ध आहेच पण या गावात दरवर्षी खिंचन भागात लाखोच्या संखेने सारस हे प्रवासी पक्षी येतात. ऑगस्ट ते मार्च पर्यंत येथे २० हजाराहून अधिक पक्षी येतात. आयपीएल आणि निवडणूक काळात देशात सट्टयावर बंदी असूनही येथे अडीच ते तीन कोटींचा सट्टा लागतो असेही सांगतात.