मर्लिन मन्रोच्या प्रसिद्ध चित्राचा होणार लिलाव

अँडी वॉरहॉल याने दिवंगत हॉलीवूड अभिनेत्री मर्लिन मन्रो हिची अनेक चित्रे रेखाटली होती. त्यातील एका प्रसिद्ध चित्राचा लिलाव क्रिस्टी या नामवंत लिलाव संस्थेकडून केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात क्रिस्टीने दिलेल्या माहितीनुसार मे मध्ये हे चित्र लिलावात मांडले जाईल. त्या चित्राला २० कोटी डॉलर्स किंमत अपेक्षित आहे. खरोखरच या चित्राला तितकी किंमत मिळाली तर ते २० व्या शतकातील सर्वात महाग चित्र ठरणार आहे.

वॉरहॉलने ‘ शॉट सेज ब्ल्यू मर्लिन’ नावाने काढलेले हे चित्र १९६४ मध्ये रेखाटले होते. त्यात मार्लिनला लाल गडद लिपस्टिक आणि निळ्या रंगाच्या आयशॅडो मध्ये दाखविले गेले आहे. तिचे केस सोनेरी रंगविले गेले आहेत. या चित्राला लिलावात मिळणारी रक्कम थॉमस अँड डोसीस अम्मान फौंडेशनला दिली जाणार आहे. त्यांनीच हे चित्र विक्रीसाठी दिले आहे. ही संस्था मुलांचे शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात काम करते.

वॉरहॉलने मार्लिन मन्रोची अनेक चित्रे काढली होती त्यातील शॉट सेज ब्ल्यू मर्लिन हे चित्र विशेष गाजले आणि जगभरातील संग्रहालयात ते प्रदर्शित केले गेले आहे. मर्लिन लोकप्रिय अभिनेत्री होती आणि तिला रहस्यमय मृत्यू आला होता. तिच्या मृत्यूचे गूढ आजही कायम आहे. अमेरीकेचे माजी अध्यक्ष दिवंगत जॉन एफ केनेडी यांच्या बरोबर मर्लिनचे नाव जोडले गेले होते.