भारतात सध्या करोनाची तीव्रता खूपच कमी झाल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र आता कोविड १९ चे नवे व्हेरीयंट देशाच्या अनेक राज्यात पोहोचले असल्याची खबर नव्याने आली आहे. करोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रोन या दोन विषाणूं पासून बनलेले नवे डेल्टाक्रोन व्हेरीयंट भारतात दाखल झाल्याची बातमी मनी कंट्रोलने दिली आहे. कोविड जिनोमिक्स कन्सोर्सीयम व जीएसएआयडी यांनी देशात या व्हेरीयंट च्या ५६८ संशयित केसेस असल्याचा इशारा दिला आहे.
या संशयित केसेस मध्ये कर्नाटकात २२१ केसेस असून कर्नाटक डेल्टाक्रोनचा हॉटस्पॉट ठरू शकेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडू मध्ये ९०, महाराष्ट्रात ६६, गुजरात ३३, पश्चिम बंगाल ३२, तेलंगण २५ व नवी दिल्लीत २० संशयित रुग्ण आहेत असे समजते.
करोना तज्ञांच्या मते हा सुपरसुपर म्युटेट व्हायरस बीए.१ + बी.१.६१७.२ असा हायब्रीड स्ट्रेन असून सर्वप्रथम तो सायप्रस येथे सापडला होता. संशोधकांनी तेव्हा ही प्रयोगशाळेतील तांत्रिक चूक असल्याचे जाहीर केले होते पण आता डेल्टाक्रोनच्या केसेस ब्रिटन मध्ये मिळत आहेत. हे नवे व्हेरीयंट किती धोकादायक आहे यावर अध्ययन सुरु आहे. जानेवारी २०२२ मध्ये फ्रांस मध्ये या विषाणूचा प्रसार होण्यास सुरवात झाली होती. जागतिक आरोग्य संघटनेने हा विषाणू अतिशय वेगाने संक्रमित होतो असा इशारा दिला आहे.