झोमॅटो देणार १० मिनिटात फूड डिलिव्हरी

फूड डिलिव्हरीसाठी लोकप्रिय असलेले झोमॅटो अधिक त्वरेने काम करण्यासाठी तयारीस लागले असून संस्थापक दिपिंदर गोयल यांनी सोमवारी त्यांच्या ब्लॉगवरून या संदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणतात, अनेक ग्रोसरी डिलिव्हरी कंपन्या १० मिनिटात ग्राहकाला डिलिव्हरी देत आहेत. झोमॅटोचा सरासरी वेळ ३० मिनिटे आहे. या संथ गतीतून बाहेर पडण्यासाठी आम्हाला आमच्यात बदल करावे लागणार आहेत. अन्यथा अन्य कुणी या रेस मध्ये पुढे जाईल. टेक उद्योगात टिकून राहायचे असेल तर इनोव्हेशन आणि पुढे जाणे दोन्ही गरजेचे आहे. म्हणून आम्ही सुद्धा १० मिनिटात फूड डिलिव्हरी साठी तयार होत आहोत.’

यासाठी झोमॅटो फूड ऑफरिंग झोमॅटो इन्स्टा सह येत आहे. ग्राहकांकडून ज्या भागातून अधिक मागणी आहे तेथे फिनिशिंग स्टेशन नेटवर्क उभारली जात आहेत. यामुळे ग्राहकाला १० मिनिटात ताजे, गरम अन्नपदार्थ मिळू शकतीलच पण किमती सुद्धा कमी करणे शक्य होणार आहे. डिश लेवल डिमांड म्हणजे कोणत्या पदार्थांना अधिक मागणी याचा अंदाज त्यासाठी घेतला जाणार आहे. रोबोटिक्सच्या सहाय्याने हे शक्य आहे. फिनिशिंग स्टेशन मध्ये रेस्टॉरंटच्या पुर्वानुमानाप्रमाणे २०-३० पदार्थ तयार ठेवता येतात असे त्यांचे म्हणणे आहे.