या सायबर ग्रुप हॅकर्सच्या हल्ल्यांनी जेरीस आलाय रशिया

युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यापासून एक सायबर हॅकर ग्रुप फारच चर्चेत आला असून रशिया त्यांच्या सायबर हल्ल्यांमुळे जेरीस आल्याचे सांगितले जात आहे. ‘अॅनानिमस’ या नावाची ही कम्युनिटी फारच मजबूत असून सर्व ऑफलाईन आणि ऑनलाईन हॅकर व अॅक्टीव्हीटी कम्युनिटीसाठी हा प्लॅटफॉर्म मानला जातो. ही आंतरराष्ट्रीय संस्था भारतातील काही हॅकर ग्रुपशी सुद्धा जोडलेली आहे. हे हॅकर नेहमीच अज्ञात राहतात, स्वतःची ओळख देत नाहीत.

कधीतरी ते रस्त्यांवर निदर्शने करताना दिसतात पण त्यावेळी त्यांनी ठराविक प्रकारचे मास्क लावलेले असतात. अॅनानिमस जगभरातील सरकारे, त्यांच्या संस्था, कार्पोरेशन्स, चर्च विरोधात हॅकिंगचे काम करतात. त्यांचे हे सायबर हल्ले नेहमीच चर्चेत येतात. नुकतेच रशियाच्या सर्व सरकारी एजन्सीज वर त्यांनी हल्ले केले आहेत. रशियाच्या अधिकृत टीव्ही चॅनल वरचे प्रसारण त्यांनी हॅक केले. टीव्ही प्रसारण हॅक करणे हे सोपे काम नाही. प्रसारण मध्येच थांबवून रशियाच्या हल्ल्यामागील सत्य सांगायला त्यांनी सुरवात केली होती.

रशियन सैन्याला त्यांनी सरकारी वेबसाईट हॅक करून विचित्र मेसेज दिले. त्यानुसार युद्धात आत्मसमर्पण केलेत तर तुम्ही मालामाल होऊ शकता असे मेसेज होते. हे हॅकर्स ते करत असलेल्या कृत्यांचे समर्थन करतात आणि आम्ही योग्य तेच करतोय असे सांगतात. युक्रेन मध्ये निष्पाप आणि निरपराध नागरिक बळी पडत आहेत. युकेन मध्ये शांती स्थापित होण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत तर रशियावरील सायबर हल्ले वाढविणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. रशियाच्या अनेक वेबसाईट मध्ये त्यांनी छेडछाड केली आहे. या संस्थेचे डोमेन किंवा प्रतिक मस्तक नसलेली एक व्यक्ती आहे. या संस्थेचे प्रमुख इंटरनेट माध्यमातून संदेश देतात. सरकारी वेबसाईट हॅक केल्याने सरकारपुढे अडचणी निर्माण होतात.

गाय फोकस नावाच्या १६ व्या शतकातील स्पेन चा योद्धा आणि त्याच्या वेशभूषेचा मास्क ही या संस्थेची ओळख आहे.