चीन लॉकडाऊन लांबला तर महाग होणार मोबाईल्स, वाहने, टीव्ही

चीन मध्ये ओमिक्रोनचा संसर्ग भयावह स्थितीत पोहोचला असल्याने अनेक शहरात लॉकडाऊन लावला गेला आहे. टेक हब असलेल्या शेंजेन शहरात सुद्धा लॉकडाऊन लागला असून हा लॉकडाऊन आणखी तीन आठवडे सुरु राहिला तर भारतात टीव्ही, लॅपटॉप्स, स्मार्टफोन्स, वाहनांच्या किमतीत वाढ होणे अपरिहार्य असल्याचे जाणकार सांगत आहेत.

इंटरनॅशनल डेटा कार्पोरेशन(आयडीसी) रिसर्चचे संचालक नवकारसिंग यांच्या म्हणण्यानुअर भारतात २० ते ५० टक्के इलेक्टोनिक उपकरण पूर्ती चीनमधून होत असते आणि त्यात शेंजेनची मोठी हिस्सेदारी आहे. शेंजेन मधून होणारा पुरवठा प्रभावित झाला किंवा लॉकडाऊन लांबला तर सर्व ब्रान्डस च्या किमती वाढणे अपरिहार्य आहे. कच्च्या मालाच्या किमती अगोदरच वाढल्याने कंपन्यांचा वाहतूक खर्च वाढला आहे आणि त्यामुळे अनेक कंपन्या हा खर्च पेलण्याच्या स्थितीत नाहीत. वाढलेल्या खर्चाचा भार ग्राहकावरच पडणार आहे.

शेंजेन मधून होणारा पुरवठा कमी झाल्याने जून तिमाही आणि सप्टेंबर तिमाहीवर त्याचा प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे सर्व उपकरणाच्या किंमती ५ ते ७ टक्के वाढतील. स्मार्टफोन निर्माते आणि ऑटो क्षेत्राला अगोदरच स्मार्ट चिप ची कमतरता जाणवत आहे. अनेक कंपन्याकडे जेमतेम १ ते दीड महिन्याचा स्टॉक आहे. त्यामुळे एप्रिल पासून उत्पादन कमी करण्याचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे. याचाही परिणाम किमती वाढण्यात होणार आहे.