दहशतवाद फंडिंग- कडक कारवाईसाठी गुप्तचर संस्थाना अमित शहांकडून पूर्ण मोकळीक

जम्मू काश्मीर भागात दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी फंडिंग करणारे दहशतवादी, फुटीरतावादी आणि पाकिस्तानात बसून त्यांना सहाय्य करणाऱ्या दहशतवादी संघटना यांच्यावर कडक कारवाई करण्याची पूर्ण मोकळीक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा संस्थाना दिली आहे. परिणामी  फंड गोळा करून दहशतवादाला खतपाणी घालणे आता सहज सोपे राहिले नसल्याचे समजते. दोन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आलेल्या गृहमंत्र्यांनी सुरक्षा संस्थाच्या वरिष्ठांशी चर्चा केली असून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या सर्वांची नेटवर्क पूर्ण उध्वस्त करा असे आदेश दिले आहेत.

गेल्या वर्षात अश्या फंडिंग मधून गोळा झालेल्यापैकी ३ कोटी रुपयांचे भारतीय चलन जप्त केले होते. तुरुंगात असलेले फुटीरतावादी नेते मसरत आलम, यासीन मलिक,शब्बीर शाह, बिट्टा कराते आजही अनेकांच्या संपर्कात आहेत. देशात राहून ते विदेशातून फंड गोळा करत आहेत. एनआयए आणि तमाम गुप्तचर यंत्रणांनी अश्या लोकांची यादी तयार केली असून हे लोक थेट गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर आहेत असे बोलले जाते.

राजोरी, पूंछ, कुपवाडा व पंजाब मधील काही लोक दहशतवाद्यांसाठी फंडिंग गोळा करत आहेत. त्यातील काही पंजाब तुरुंगात आहेत. सुरक्षा यंत्रणांनी या संदर्भातील सर्व माहिती गृहमंत्री अमित शहा यांना दिल्यानंतर त्यांनी ही सर्व नेटवर्क उध्वस्त करण्याचे आदेश आणि मोकळीक दिली आहे. त्यामुळे येत्या काही काळात एनआयए, एसआयए व पोलीस या संदर्भात कडक कारवाया करतील. दहशतवाद्यांना ड्रगच्या माध्यमातून सुद्धा पैसा पुरविला जात आहे. त्या संदर्भात काही माजी दहशवाद्यांवर गुप्तचर यंत्रणांची नजर आहे.