जम्मू काश्मीर गुंतवणूक- खाडी देशातील प्रतिनिधी दाखल

जम्मू काश्मीर मध्ये हॉटेल, पर्यटनसह अन्य महत्वाच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी खाडी देश उत्सुक असून त्या संदर्भातील हालचालींना गती आली आहे. रविवारी खाडी देशातील ३६ प्रतिनिधी श्रीनगरच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आले असून येथील कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या चर्चा सत्रात गुंतवणूक शक्यतेसंदर्भातील चर्चा करून हे प्रतिनिधी निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार दुबई येथील एक्स्पो मध्ये खास पद्धतीने जम्मू काश्मीर आठवडा साजरा केला गेला त्याला मनोज सिन्हा उपस्थित राहिले होते. त्याचवेळी खाडी देशाचे प्रतिनिधी चर्चेसाठी भारताला भेट देतील असे ठरले होते. विविध उद्योग, हॉटेल, आदरातिथ्य क्षेत्र, पर्यटन अश्या विभागात गुंतवणूक केली जाऊ शकते हे लक्षात घेऊन हे प्रतिनिधी मंडळ गुलमर्ग,पेहेलगम भागाला भेट देणार आहे.

आयात निर्यात संबंधित स्टार्टअप या प्रतिनिधीना प्रेझेन्टेशन देत आहेत. त्यात कुटिरोद्योग, रेशीम, हस्तकला कारागीरांशी भेटी घालून दिल्या जात आहेत. ३६ प्रतिनिधी पैकी ३० विविध कंपन्यांचे सीईओ आहेत. सौदी समवेत अन्य देशांचे प्रतिनिधी येथे आले आहेत. लुलू समूह, अल माया ग्रुप, माटू इन्व्हेस्ट, एलएलसी, जीएल एम्प्लॉयमेंट ब्रोकेज, नून ग्रुप यांच्याशी एमओयु दुबई मध्येच झाल्याचे सांगितले जात आहे.