१६ वर्षाच्या करियरमध्ये देवाकडून पडला नाही एकही ‘नो बॉल’

क्रिकेटच्या खेळात जेवढे महत्व फलंदाजीला आहे तितकेच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाला सुद्धा आहे. या तिन्ही कामगिऱ्या करणाऱ्या खेळाडूना अष्टपैलू म्हटले जाते. गोलंदाजाना नेहमी सतावणारी समस्या म्हणजे ‘नो बॉल किंवा वाईड बॉल’. कारण यामुळे अनेकदा सामना फिरू शकतो. जगात हाताच्या बोटावर मोजण्याइतके असे गोलंदाज आहेत ज्यांनी त्यांच्या संपूर्ण करियर मध्ये एकही नो बॉल टाकला नाही. असे पाच गोलंदाज असून त्यातील एक भारतीय आहे.

हा गोलंदाज भारताचा अष्टपैलू खेळाडू असून त्याचे नाव आहे कपिल देव. भारताला १९८३ मध्ये वल्ड कप मिळवून देण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर आहेच पण १९७८ ते १९९४ अश्या १६ वर्षाच्या झळाळत्या कारकिर्दीत त्यांनी एकही नो बॉल टाकलेला नाही. वेगवान गोलंदाज असूनही  त्याच्या हातातून कधीच बॉल सुटला नाही किंवा बॉल टाकताना पाय रेषेच्या पुढे पडला नाही. ही कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय क्रिकेटर आहेत. त्यांच्या नावावर १३१ कसोटी, २२५ वनडे, ५२४८ कसोटी धावा, ३७८३ वनडे धावा जमा आहेत. कसोटीत त्यांनी ४३४ तर वनडे मध्ये २५३ बळी घेतले आहेत.

या यादीत वेस्टइंडीजचे लान्स गिबन, ऑस्ट्रेलियाचे डेनिस लिली, इंग्लंडचा इयान बोथम आणि पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांचा समावेश आहे.