सुरक्षित आहे युक्रेनची जगप्रसिद्ध मांजरी ‘स्टीपान’

रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहेत आणि युक्रेन त्याचा सामना करत आहे. या युद्धामुळे ४० लाखाहून अधिक युक्रेनी नागरिक देश सोडून अन्य देशात आश्रयास गेले आहेत. अश्यावेळी युक्रेनमधली सोशल मिडीयावर प्रचंड लोकप्रिय असलेली मांजरी कशी आहे आणि कुठे आहे यांची बातमी मिळविण्यास तिचे चाहते उत्सुक आहेत. स्टीपान नावाच्या या ग्रंपी कॅटच्या मालकिणीने स्टीपान सुरक्षित असल्याने कळविले आहे.

स्टीपान सोशल मिडीयावर अतिशय फेमस असून तिच्या नावावर अनेक मिम्स बनली आहेत. युक्रेनवर हल्ला झाल्यावर तिची मालकीण स्टीपानच्या ११ लाख इन्स्टाग्राम फोलोअर्सना युक्रेन आणि या मांजरीची परिस्थिती याच माध्यमातून कळवत होती. पण ३ मार्च ला शेवटची पोस्ट टाकली गेली आणि त्यानंतर आठवडाभर काहीच पोस्ट आली नाही. तेव्हा युक्रेनच्या खार्कीव येथे राहत असलेल्या स्टीपानचा युद्धात बळी गेला असावा या काळजीने तिचे चाहते व्याकुळ झाले होते. मात्र आठवड्यानंतर घाबरलेल्या स्टीपानचे फोटो तिच्या मालकिणीने शेअर केले आहेत.

एका फोटो मध्ये बॅग मध्ये घाबरून गेलेली स्टीपान दिसते आहे तर दुसऱ्यात रेल्वेतून प्रवास करताना दिसते आहे. स्टीपान सुरक्षितपणे युक्रेन बाहेर पडली आहे. तिची मालकीण लिहिते, खार्कीव्ह मधील स्वयंसेवकानी त्यांना सुरक्षित रेल्वेस्टेशन वर सोडले. २० तासाचा प्रवास करून या दोघी पोलंड बोर्डरवर पोहोचल्या. तेथे खूप गर्दीतून पोलंड हद्दीत प्रवेश केल्यावर मोनॅकोच्या वर्ल्ड इंफ्ल्यूएन्सर अँड ब्लोगर असोसिएशनने त्यांना फ्रांस मध्ये पोहोचण्यास मदत केली. आता दोघी फ्रांस मध्ये आहेत.

स्टीपानची मालकीण अॅना हिला मात्र आता युक्रेनमधील तिचे कुटुंब आणि युक्रेन नागरिकांची चिंता लागून राहिली आहे.