भारतात येणार करोनाची चौथी लाट?

जगभरातील अनेक देशात करोनाचे नवे व्हेरीयंट वेगाने पसरत असले तरी भारतीय तज्ञांना मात्र फारशी चिंता करण्याची गरज अद्यापि वाटत नाही असे समजते. करोनाच्या ओमिक्रोनच्या नव्या व्हेरीयंट ने हॉंगकॉंग, चीन, द. कोरिया सह अन्य अनेक युरोपीय देशात पुन्हा हाहाकार माजविला आहे. ओमिक्रोनचा हा नवा व्हेरीयंट ज्या वेगाने फैलावतो आहे ते पाहता भारतात कारोनाची चौथी लाट येऊ शकते का अशी चर्चा सुरु झाली आहे. ओम्रीक्रोनच्या बीए २ व्हेरीयंटने द. कोरियात प्रचंड वेगाने आक्रमण सुरु केले आहे आणि येथे ६ लाख नवे रुग्ण नोंदले गेले आहेत. ब्रिटन आणि अन्य युरोपीय देशात पुन्हा संक्रमितांची संख्या लाखांत गेली आहे.

भारतात मात्र करोनाच्या चौथ्या लाटेची त्वरित शक्यता नाही असे या क्षेत्रातील तज्ञाचे म्हणणे आहे. भारतात डिसेम्बर २१ ते फेब्रुवारी २०२२ मध्ये करोनाची तिसरी लाट होती त्यामुळे येथील नागरिकांची इम्युनिटी वाढलेली आहे. शिवाय अनेक राज्यात लसीकरणाचा वेगही चांगला आहे. तरीही केंद्र आणि राज्य सरकारे करोना लाट आलीच तर त्याच्या प्रतिकारासाठी सज्ज आहेत. जगात अन्य देशांप्रमाणे भारतात करोना लाट येऊ शकते मात्र त्यासाठी चिंता करण्याची गरज नाही असे सांगितले जात आहे.

ओमिक्रोनचा नवा व्हेरीयंट ५० वेळा म्युटेट झाला आहे. २०२१ नोव्हेंबर मध्ये करोनाचा ओमिक्रोन व्हेरीयंट आफ्रिकेत सापडला होता. हा व्हेरीयंट वेगाने पसरणारा आहे. काही देशात या विषाणूमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना रुग्णालयात हलवावे लागले तर काही देशात या विषाणूने अनेक जीव घेतले आहेत. पण जेथे लसीकरण झाले आहे तेथे या विषाणूचा प्रभाव कमी राहिला आहे असे दिसून आले आहे.