काश्मीर फाईल्सच्या विवेक अग्निहोत्रीना ‘वाय’ सुरक्षा

काश्मिरी पंडितांच्या नरसंहार आणि काश्मीर मधून करावे लागलेले पलायन या विषयावर आलेला ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट तयार करणारे विवेक अग्निहोत्री यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने त्यांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालत असून एका आठवड्यात त्याने १०० कोटींचा व्यवसाय केला असल्याचे आकडेवारी सांगते.

चित्रपट प्रसिद्ध झाल्यापासून देशात त्यावर वादविवाद, आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. विवेक अग्निहोत्री यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे सांगितले जात आहे. विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीर मधून पलायन करावे लागलेल्या पंडितांच्या पहिल्या पिढीतील लोकांच्या मुलाखती, प्रत्यक्ष भेटी आणि चर्चा असे चार वर्षे माहिती गोळा केल्यानंतर हा चित्रपट बनविला आहे. बीजेपीने चित्रपटाचे कौतुक केले आहे तर कॉंग्रेसने युवकांना भडकविण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.

कोणत्या व्यक्तीला कुठल्या दर्जाची सुरक्षा द्यायची याचा निर्णय केंद्र सरकार घेत असते. त्यासाठी इंटेलिजन्स ब्युरो कडून संबंधित व्यक्तीला खरेच धोका आहे का याची तपासणी करून मग केंद्राला तशी शिफारस केली जाते. केंद्रीय गृहमंत्रालय दरवर्षी अशी सुरक्षा दिल्या गेलेल्या व्यक्तींच्या सुरक्षेची समीक्षा करते. विवेक अग्निहोत्री यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली असून त्यांच्यासोबत सीआरपीएफचे ४ ते ५ सशत्र कमांडो चोवीस तास राहणार आहेत. देशभर प्रवासादरम्यान सुद्धा त्यांना ही सुरक्षा राहील. दरम्यान गुगलवर विवेक अग्निहोत्री यांच्यासाठी प्रचंड प्रमाणावर सर्च होत असल्याचे दिसून आले आहे.