२१ मार्च रोजी अंदमान निकोबारला ‘असानी’चा दणका

या वर्षातले पहिले चक्रीवादळ अंदमान निकोबार किनाऱ्यावर २१ मार्च रोजी धडकेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले तर या वादळाला ‘असानी’ नाव दिले जाणार आहे. हे नाव श्रीलंकेने सुचविले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार यावर्षीचे हे पहिले चक्रीवादळ असेल. दक्षिण पूर्व बंगाल खाडीवर हे तयार झाले असून शुक्रवार पासून अंदमान निकोबार येथे वादळी पावसाची शक्यता आहे. मंगळवारी बंगाल खाडीच्या दक्षिणपूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र असून १९ मार्चच्या सकाळी हे पूर्वउत्तर पूर्वेकडे सरकेल व पुन्हा उत्तरेकडे येऊन २० मार्चला अंदमान निकोबार मध्ये पोहोचेल.

रविवारी या भागात ५५ ते ७५ किमी प्रतीतास वेगाने वारे वाहतील आणि सोमवारी त्यांचे चक्रीवादळात परिवर्तन होईल असा अंदाज आहे. २२ मार्च रोजी ते बांग्लादेश आणि उत्तर म्यानमार किनाऱ्याकडे सरकेल. वादळाला तोंड देण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन टीम अगोदरच पोर्ट ब्लेअर येथे तैनात आहे. गरज पडल्यास त्यांच्या मदतीला आणखी फौज येणार आहे. केंद्रीय मंत्रालायच्या गृह विभागाने नियमित निगराणी साठी अंदमान निकोबार प्रशासनाशी सतत संपर्क ठेवला आहे. गुरुवारीच मासेमारी, पर्यटन, जहाज वाहतूक यावर बंदी घातली गेली असून भारतीय सेनेच्या तिन्ही दलाना दक्षतेचे आदेश दिले गेले आहेत.