संकटात संधी- रशिया युक्रेन युद्धात अमेरिकेची चांदी

रशिया युक्रेन युद्धाचा आज २१ वा दिवस. काल रात्रभर रशियाने कीव शहरावर बॉम्बहल्ले केले आहेत आणि युद्ध परिस्थिती दिवसेनदिवस गंभीर होत चालली आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फायदा अमेरिकेला झाला असल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेचा दबदबा थोडा कमी झाला असला तरी अमेरिकन शस्त्रांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. पूर्ण जगाला शस्त्रांसाठी आपल्याकडे पाहण्यास अमेरिकेने भाग पाडल्याने चित्र सध्या स्पष्ट होत आहे.

युरोप मधील अनेक देशांनी अमेरिकी शस्त्र उत्पादक कंपन्यांकडे ड्रोन, मिसाईल्स, मिसाईल डिफेन्स उपकरणे, खरेदीसाठी ऑर्डर नोंदविण्यास सुरवात केली आहे. लवकरात लवकर आपापल्या देशांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी हे देश तत्परता दाखवीत आहेत. जर्मनी आणि पोलंडने अमेरिकी कंपन्यांबरोबर अब्जावधी डॉलर्सचे शस्त्रखरेदी करार केले आहेत. लॉकहिड मार्टिन बरोबर ३५ एफ ३५ लढाऊ विमान खरेदीचा सौदा अंतिम टप्प्यात असून अँटी मिसाईल डिफेन्स सिस्टीम साठी चौकशी सुरु आहे.

पोलंडने एमक्यू ९ रिपर ड्रोन साठी करार केले आहेत. विशेषतः युक्रेनने रशियाविरुद्ध ज्या हत्यारांचा वापर करून रशियाचे नुकसान केले आहे त्या हत्याराना अधिक मागणी युरोपीय देशांकडून होत आहे. अनेक देशांनी त्यांचे संरक्षण बजेट कोट्यावधी डॉलर्सने वाढविले आहे. जर्मनी, स्वीडन, डेन्मार्क अश्या देशांनी संरक्षण खर्चासाठी भक्कम तरतूद केली आहे. अमेरिकी शस्त्र उत्पादन कंपन्यांना विदेशी विक्री करण्याअगोदर सरकारची परवानगी घ्यावी लागते. अमेरिकेच्या जेवलीन, स्ट्रिंगर मिसाईलना मोठी मागणी असून सरकारने या कंपन्यांना विक्रीसाठी प्राधान्याने परवानगी देण्याचे धोरण राबविले असल्याचे सांगितले जात आहे.