जर्सी नंबर, अंधविश्वास नाही- माहीने केला खुलासा

आयपीएल मधील चेन्नई सुपर किंग्स टीमचा कप्तान महेंद्रसिंग धोनी उर्फ माहीने एक महत्वाचा खुलासा नुकताच केला आहे. धोनीने त्याच्यासाठी सात नंबर निवडला तो अंधविश्वास नाही तर हा नंबर त्याच्या फार जवळ असल्याने निवडल्याचे स्पष्ट केले आहे. धोनीच्या जर्सीचा किंवा अन्य सामन्यातील शर्टचा नंबर ७ आहे. आंतरराष्ट्रीय डेब्यू पासून धोनी याच नंबरचा वापर करत आहे. त्यामुळे धोनीचा हा लकी नंबर असल्याची चर्चा नेहमीच होत आली आहे.

विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात ७ नंबरची लोकप्रियता बरीच वाढल्याचे सुद्धा दिसून आले आहे. चेन्नई सुपरकिंग्जची मालकी असलेल्या मूळ समूह इंडिया सिमेंटच्या एका मुलाखतीत धोनीने त्याने ७ नंबर का निवडला याचा खुलासा केला आहे. धोनी म्हणाला, यामागे कोणतीही अंधश्रद्धा नाही. त्याचा जन्म सातवा महिना जुलै मध्ये सात तारखेला झाला आहे. त्यामुळे हाच आकडा निवडण्याचा निर्णय मी घेलता. हा नंबर माझ्यासाठी भाग्यशाली किंवा लकी आहे म्हणून नाही.

चेन्नई सुपरकिंग्जने गेल्या आठवड्यात आयपीएल २०२२ साठी सुरत येथे प्रशिक्षण सुरु केले असून येथील सुविधा अत्यंत चांगल्या असल्याचे माही सांगतो.  १५ व्या आयपीएल सिझनची सुरवात २६ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडीयम वर होणाऱ्या सामन्यापासून होत आहे.