इन्स्टाग्रामला पर्याय, रशियाने आणले  स्वदेशी रोसग्राम 

युक्रेन युद्ध सुरु असतानाच रशियाने इन्स्टाग्रामला पर्याय म्हणून स्वदेशी अॅप लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. रोसग्राम नावाने हे अॅप २८ मार्च रोजी लाँच केले जाणार असल्याचे जाहीर केले गेले आहे. युक्रेन रशिया युद्धामुळे रशियावर विदेशांकडून अनेक प्रकारचे निर्बंध घातले गेले आहेत. त्यात फेसबुक, इन्स्टा यांनी रशियातील त्यांची सेवा बंद केली आहे. यामुळे अनेक छोट्या मोठ्या रशियन व्यावसायिकावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्याला उत्तर म्हणून हे रशियन रोसग्राम तयार केले गेले आहे.

रोसग्रामचे जनसंपर्क अधिकारी अलेक्झांडर जोबोव यांनी या अॅपवर रशियाने पूर्वीच काम सुरु केले असल्याचे सांगितले असल्याची बातमी रॉयटरने दिली आहे. त्यानुसार या अॅपमध्ये काही कंटेंट साठी क्राऊड फंडिंग व पेड अॅक्सेस सारख्या जादा सुविधा दिल्या गेल्या आहेत. स्थानिकांना या अॅपचा चांगला फायदा मिळणार आहे. या निमित्ताने आमच्या देशवासियांसाठी लोकप्रिय सोशल नेटवर्क रशियन अॅनालॉग बनविण्याची संधी मिळाल्याचे जोबोव यांचे म्हणणे आहे. रोसग्रामचा रंग आणि डिझाईन इन्स्टाग्रामशी साधर्म्य दाखविणारे आहे. रशिया स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी वेगाने काम करत आहे. यात एवायआयए टी १ स्मार्टफोनचा सुद्धा समावेश आहे.