आसाम चहा कंपनीने आणला, ‘झेलेन्स्की’ कडक चहा

भारतीयांसाठी चहा अमृतापेक्षा कमी नाही. चहाशी भारतीयांचे नाते फार जुने आणि मुरलेले तर आहेच पण रोजची सकाळ कडक चहा शिवाय सुरूच होत नाही असे म्हटले जाते. आजकाल ग्रीन टी, फ्लेवर्ड टी अशी काही फॅड वाढत चालली असली तरी देशी कडक चहाला तोड नाहीच. आसाम मधील एका चहा कंपनीने त्यांच्या नवीन, मजबूत आणि कडक मिक्श्चरला युक्रेन राष्ट्रपती बोलोदिनोर झेलेन्स्की यांचे नाव दिले आहे. रशियाने आक्रमण केल्यावर झेलेन्स्की यांनी अत्याधिक ताकद आणि अदम्य साहस क्षमता शाबित केली आहे. त्यांच्या या गुणांचा आदर म्हणून चहाचे नामकरण झेलेन्सी टी असे केल्याचे सांगितले जात आहे.

आसामच्या एरोटीका टी कंपनीने मजबूत, आसाम ब्लॅक टी नवीन चहा झेलेन्स्की यांना अर्पण केला आहे. कंपनीचे प्रमुख रंजित बरुआ म्हणाले, परंपरागत चहा आणि सीटीसीचे हे आदर्श मिश्रण आहे. यात खास स्वाद आहे. आसाम चहा मुळातच स्वाद आणि सुगंध, कडकपणासाठी ओळखला जातो. युक्रेनने बलाढ्य रशियाचे आक्रमण ज्या प्रकारे थोपविले आहे त्यासाठी मजबूत मन हवे. यावेळी जगात झेलेन्सी यांच्या इतके कुणीच मजबूत नाही. त्यामुळे या चहाला त्यांचे नाव दिले गेले आहे. गोहाटी कंपनीच्या वेबसाईटवर हा चहा उपलब्ध केला गेला असून १०-१५ दिवसात विभिन्न ई कॉमर्स साईटवर तो मिळू शकेल. २०० ग्राम साठी ९० रुपये अशी त्यांची किंमत आहे. कंपनीच्या कॅटलॉग मध्ये चहाचे ४० विविध प्रकार आहेत.