महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांचा राजीनामा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार अखेर घेणार असल्याची बातमी आली आहे. मलिक यांच्या कडून मंत्रालयाची तसेच मुंबई युनिटच्या दोन विभागांची जबाबदारी काढून घेतली जाईल असे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी राष्ट्रावादी कॉंग्रेस प्रमुख शरद पवार यांनी अन्य नेत्यांसोबत एक बैठक घेतली. पवार यांच्या घरीच रात्री उशिरा झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील,, छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हजर होतेच शिवाय वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हेही हजर होते.
मलिक सध्या आर्थर रोड जेल मध्ये असून ईडीने त्यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम मनी लाँड्रींग केस मध्ये २३ फेब्रुवारीला अटक केली होती. ही अटक राजकीय सूड बुद्धीने केल्याचा आरोप करून पवार यांनी मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न येत नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र विरोधी पक्ष भाजपने मलिक यांच्या राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव आणल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मलिक यांच्या १-१ विभागाची जबाबदारी कॅबिनेट मधील मंत्र्यांकडे देण्यावरून या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. मुंबई युनिट च्या साठी २ कार्यकारी अध्यक्ष नियुक्तीची चर्चा सुद्धा झाल्याचे सांगितले जात असून ही युनिट सध्या मलिक यांची जबाबदारी आहे.