संकटात संधी,  युक्रेन मधील लग्नाऊ मुलीना चीनी मुलांकडून पसंती

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध २० दिवस झाले तरी अजून सुरु आहे. या संकटात चीनी मुलांना मात्र संधी मिळाली आहे. चीन मध्ये ‘मेल ऑर्डर ब्राईड’ व्यवसाय अत्यंत लोकप्रिय बनला आहे. चीन मध्ये दीर्घकाळ राबविल्या गेलेल्या वन चाईल्ड पॉलीसी मुळे उपवर वधू मुलींची संख्या इतकी कमी आहे कि तेथे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. त्यामुळे त्यांनी युक्रेनी मुलींमध्ये अधिक रस दाखवायला सुरवात केली आहे.

ऑनलाईन वेबसाईट वर युक्रेनी वधुंसाठी चीनी उपवर मुलांमध्ये रस वाढला असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. डेटिंग सर्व्हिस मिलीश्काच्या डेटिंग वेबसाईटवर रशिया युक्रेन युध्द सुरु होण्यापूर्वी युक्रेनी वधूसाठी सरसरी पाच चौकश्या येत असत त्यात आता जवळजवळ पाचपट वाढ झाली आहे. विशेष म्हणजे युक्रेन मध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त आहे. या वेबसाईट नुसार सध्या ७४८ युक्रेनी मुली चीनी नवऱ्याच्या शोधात आहेत तर ७० चीनी मुले युक्रेनी वधू शोधत आहेत. त्यातील ८-९ विवाह नक्की झाले आहेत.

स्टेपनेटस या डेटिंग सर्विसचा रशियन मालक पावेल यांच्या मते युक्रेनी मुलीना खूप मागणी आहे. त्यात आता त्यांच्या देशावर युद्धाचे संकट आहे. त्यामुळे त्या घाबरलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी चीन सुरक्षित देश आहे. युक्रेनी मुलीनी चीनी मुलांबरोबर विवाह करणे ही प्रथा जुनी आहे. दीर्घकाळ युक्रेनी मुली चीनी नवरा निवडत आहेत. रशियाचे आक्रमण झाल्याने या संख्येत वाढ दिसते आहे. चीनी मुलांना युक्रेनी मुली अधिक पसंत आहेत कारण त्या चीनी मुलींप्रमाणे फक्त पैशाकडे पाहून विवाह करत नाहीत असेही सांगितले जाते.