रशियाचे बुद्धीबळ ओलीम्पियाड यजमानपद आता भारताकडे
२४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाचे यंदाचे ४४ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडचे यजमानपद काढून घेतले गेले असून या वर्षी या स्पर्धा भारतात चेन्नई येथे होणार आहेत. दर दोन वर्षांनी होणार्या या स्पर्धा टीम स्पर्धा असून त्यात १९० देशातील टीम सहभागी होतात. २०१३ मध्ये विश्व चँपियनशिप स्पर्धेचे आयोजन केले गेले होते त्यानंतर हे दुसरे मोठे जागतिक बुद्धीबळ स्पर्धा आयोजन केले जात आहे. अखिल भारतीय बुद्धीबळ महासंघाने या यजमानपदासाठी जागतिक बुद्धिबळ संचालन संस्था एफआयडीई (फिडे) कडे १ कोटी डॉलर्सची अमानत रक्कम जमा केल्याचे सांगितले जात आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलीन यांनी मंगळवारी रात्री ट्वीटरवर हि घोषणा केली. ते म्हणतात, ‘भारताच्या बुद्धीबळ राजधानीला ४४ व्या ऑलिम्पियाडचे यजमानपद मिळणे हे तामिळनाडू साठी अभिमानाचे आहे. चेन्नई मध्ये जगातील सर्व चेस किंग आणि क्वीन्सचे स्वागत आहे.’
यापूर्वी ही स्पर्धा मास्को मध्ये २६ जुलै ते ८ ऑगस्ट या दरम्यान होणार होती. या स्पर्धेबरोबरच रशिया कडून दिव्यांग पहिल्या बुद्धीबळ ओलीम्पियाडचे यजमानपद ही काढून घेतले गेले आहे. भारताने गतवेळी इतक्या मोठ्या पातळीवर स्पर्धेचे यजमानपद २०१३ मध्ये सांभाळले होते तेव्हा जगज्जेता विश्वनाथन आनंद आणि जगातील आजचा नंबर वन मॅग्नस कार्लसन यांच्यात जागतिक जगज्जेतेपदाची लढाई झाली होती.