या गावात आहे एकच किडनीवर जगणारी जनता

मानवी शरीर रचना अतिशय जटील आहे. कुठला अवयव किती उपयुक्त आहे याची आपल्याला फार थोडी कल्पना असते. पण परमेश्वराने मात्र अगोदरच काही अवयवांबाबत काही योजना केली आहे आणि शरीरातील अनेक अवयव जोडीमध्ये बनविले आहेत. नाकपुड्या, कान, डोळे, फुफुसे याचबरोबर असा जोडीने बनविलेला अवयव म्हणजे किडनी किंवा मूत्रपिंडे. यात जोडीतील एक खराब झाला तरी दुसर्याच्या जोरावर पुढचे आयुष्य जगता येते.

अफगाणिस्थानच्या हेरात गावाजवळ असलेल्या शेनशहा बाजार या छोट्या गावातील नागरिकांना देवाच्या या योजनेची चांगलीच कल्पना आहे. या गावातील बहुतेक लोकांना एकच किडनी आहे. अर्थात ही त्यांची जन्मजात विकृती नाही तर गरिबी आणि लाचारी मुळे त्यांच्यावर ही पाळी आली आहे. अन्नाची थाळी किंवा एक किडनी असा पर्याय त्यांच्यासमोर आहे. आता तालिबानी राज्य आल्यावर परिस्थिती आणखी बिघडली आहे.

त्यामुळे कुटुंबांसाठी पोटभर अन्न मिळवायचे तर या नागरिकांनी अवयव विक्रीचा पर्याय निवडला आहे. त्यात अनेकांनी किडनी विकून त्यातून मिळालेल्या पैशातून कर्जफेड केली आहे किंवा कुटुंबाचे पोट भरले आहे. काळ्या बाजारात किडनी विक्री हा येथील सर्वसामान्य प्रकार बनला आहे. पुरुष महिला दोघेही यात पुढे आहेत. अफगाणीस्थान मध्ये अवयव विक्री रॅकेट वर थेट नियंत्रण नाही. डोनरने कागदावर लिहून दिले कि किडनी काढली जाते. एका किडनी साठी २ लाख २१ हजार किंवा २.५०००० अफगाणी मुद्रा असा भाव आहे. एएफपीच्या बातमीनुसार ज्यांनी स्वतःची किडनी विकली आहे त्यांना आता पश्चाताप होतोय कारण ते जास्ती काम करू शकत नाहीत आणि त्यांना लवकर थकवा येतो आहे.