यंदा आयपीएल २०२२ साठी बायोबबल नियम कडक

लवकरच सुरु होत असलेल्या आयपीएलच्या १५ व्या सिझनसाठी यंदा बीसीसीआयने बायोबबलचे नियम कडक केले असून नियम तोडणाऱ्याला दंड शिवाय प्रतिबंध अशी शिक्षा होऊ शकेल. खेळाडूंच्या परिवारासाठी सुद्धा यंदा कडक नियमावली आहे. तसेच फ्रेन्चाईजी साठी सुद्धा बायोबबल नियम मोडल्यास १ कोटींचा दंड वसूल करण्याची तरतूद केली गेली आहे. गतवर्षी आयपीएल दरम्यान ज्या चुका झाल्या त्यापासून बोध घेऊन यंदा नियम अधिक कडक केल्याचे सांगितले जात आहे.

आयपीएल २०२१ मध्ये तीन संघांकडून बायोबबल नियम तोडले गेले होते आणि त्यामुळे ही स्पर्धा मध्येच थांबवावी लागली. त्याचा दुसरा टप्पा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये युएई येथे खेळविला गेला. क्रीक बज च्या रिपोर्ट नुसार  कोविड १९ आरोग्यासाठी गंभीर धोका असल्याने बीसीसीआयने यावेळी नियम अधिक कडक केले आहेत. स्पर्धा संबंधित सर्वाना ही नियमावली पाळावी लागणार आहे. बायोबबल नियम एक वेळा तोडला तर सर्व संबंधिताना ७ दिवस विलगीकारणात राहावे लागेल पण दुसऱ्या वेळी नियम तोडला तर सामना खेळता येणार नाही आणि त्या सामन्याचे पैसे मिळणार नाहीत. शिवाय पुढच्या सामन्यात खेळण्यावर प्रतिबंध लागणार आहे. ७ दिवसाच्या विलगीकरणानंतर हा प्रतिबंध लागू होणार आहे.

तिसऱ्यावेळी नियम मोडला गेला तर आयपीएल बायोबबलच्या बाहेर खेळाडूला जावे लागेल आणि त्याच्या बदली दुसरा खेळाडू फ्रेन्चाईजीला मिळू शकणार नाही. कोविड चाचणी एकदा केली नसेल तर सुरवातीला फक्त सूचना दिली जाईल पण दुसऱ्या वेळी केली नसेल तर ७५ हजाराचा दंड ठोठावला जाणार आहे. शिवाय त्या व्यक्तीला स्टेडीयम, मैदानात येण्यावर बंदी घातली जाणार आहे. फ्रेन्चाईजी ला त्यांच्या सदस्यांकडून चूक झाली असले तर १ कोटी दंड केला जाणार आहे. दुसऱ्या वेळी तीच चूक झाली तर १ गुण कमी , तिसऱ्या वेळी चूक झाली तर गुणतालिकेत दोन गुण कमी केले जाणार आहेत. चूक करणारी व्यक्ती बाहेरची असेल तर १ कोटी चा दंड होणार आहे. यावेळी स्टेडीयम मध्ये २५ टक्के प्रेक्षक येऊ शकतील असा अंदाज आहे.