रशिया युक्रेन युध्द- या औषधाला अमेरिका युरोप मध्ये प्रचंड मागणी
रशिया युक्रेन मधील युध्द अपेक्षेपेक्षा अधिक लांबल्याने तिसरे महायुद्ध, अण्वस्त्र वापर केला जाऊ शकेल अशी भीती निर्माण झाली आहे. त्यातच राशीयाने युक्रेनच्या अणुकेंद्रांवर हल्ला केल्याने किरणोत्सर्ग होण्याची भीती नागरिकांना वाटू लागली आहे. परिणामी अमेरिका आणि युरोप मधील अनेक देशात पोटॅशियम आयोडाईड या औषधाची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार युक्रेन मधील अणुकेंद्रांवर हल्ले झाले तर त्यातून किरणोत्सर्ग म्हणजे रेडीएशन चा मोठा धोका आहे. यामुळे रेडीओअॅक्टीव्ह आयोडीन हवेत पसरण्याचा धोका निर्माण होतो. हे आयोडीन हवेतून शरीरात गेल्यास फुफ्फुसे आणि थायरॉईड मध्ये शोषले जाते आणि आरोग्यासाठी ही फार हानिकारक ठरते. पोटॅशियम आयोडाईड, पोटॅशियम व आयोडीन यांच्या संयुगातून बनते. त्याला केआय असे म्हणतात. अमेरिकेच्या सेंटर फोर डिसीज अँड प्रिव्हेंशन नुसार हे संयुग म्हणजे आयोडीनचे लवण आहे. ते थायरॉईड मध्ये रेडीओ अॅक्टीव्ह आयोडीनचे शोषण होण्यास प्रतिबंध करते.
थायरॉईड या ग्रंथीतून शरीर नियंत्रित करणारी अनेक हार्मोन निर्माण होतात. रेडीओअॅक्टीव्ह आयोडीनचे शरीरात शोषण झाले तर थायरॉईड चा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पोटॅशियम आयोडाईड औषध या रेडीओ अॅक्टीव्ह आयोडीनचे शरीरात शोषण होऊ देत नसल्याने या औषधाची मागणी वाढली आहे. युरोप मधील अनेक देशात या औषधाचे साठे केले जाऊ लागले आहेत. फिनलंड मध्ये या औषधासाठीची मागणी १०० टक्के वाढली आहे.
वास्तविक पोटॅशियम आयोडाईडचे जादा सेवन शरीराला घातक ठरते आणि त्यामुळे कधी कधी मृत्यू होऊ शकतो असा इशारा तज्ञ देत आहेत.