रिलायंस कडून बॅटरी उत्पादक लिथियम रेक्सचे अधिग्रहण

रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडची सहकंपनी रिलायंस न्यू एनर्जी लिमिटेडने कोबाल्ट फ्री लिथियम बॅटरी तंत्रज्ञान व उत्पादन करणाऱ्या लिथियम रेक्स या कंपनीचे ६.१ कोटी डॉलर्स मोजून अधिग्रहण केले आहे. या करारानुसार वरील किमतीत कंपनीचे पेटंट असलेली सर्व उत्पादने, चीन मधील उत्पादन प्रकल्प, महत्वाचे व्यावसायिक करार सामील आहेत. मात्र कंपनीतील कर्मचारी वर्गाचे काय याचा खुलासा होऊ शकलेला नाही.

लिथियम रेक्सची सुरवात २०१७ मध्ये झाली होती आणि या कंपनीचा अमेरिका, युरोप आणि चीन देशात व्यवसाय विस्तार आहे. कंपनीचे ग्राहक जगभर आहेत. येथे तयार होणाऱ्या बॅटऱ्यांचा वापर ऑटो, मेडिकल, एनर्जी स्टोरेज, कमर्शियल ट्रान्सपोर्टेशन व अन्य अॅप्लीकेशन मध्ये होतो. या बॅटऱ्याना जगभरात वाढती मागणी आहेच पण लिथियम रेक्स मध्ये एलएफपी सोल्युशन पोर्ट फोलिओ असल्याने रिलायंसने हा करार केल्याचे सांगितले जात आहे. यामुळे रिलायंसला जागतिक मागणी पुरी करण्याचा फायदा मिळणार आहे.

रिलायंसने नुकतेच सोडियम आयन सेल केमिस्ट्री मध्ये ग्लोबल लीडर असलेल्या फाराडीयोन लिमिटेड चे अधिग्रहण केले आहे. या दोन्ही कंपन्या मिळून रिलायंस टेक्नोलॉजीचा पोर्टफोलीओ मजबूत होणार आहे असे समजते.