एन चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

टाटा समूहाचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांचीच एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा टाटा सन्सच्या संचालक मंडळाने केली आहे. या अगोदर तुर्की एअरलाईन्सचे माजी अध्यक्ष इल्कर आयसी यांची एअर इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र या निवडीला भारतात विरोध झाल्यामुळे आयसी यांनीच हे पद स्वीकारत नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर टाटा सन्सने हा मोठा निर्णय घेतला आहे.

११ फेब्रुवरी २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोर्डाने गेल्या पाच वर्षांची समीक्षा केली आणि कार्यकारी अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांचीच पुन्हा नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. एन चंद्रशेखरन अध्यक्ष असलेल्या टाटा सन्स कडे १०० पेक्षा अधिक टाटा ऑपरेटिंग कंपन्या व प्रमोटर यांची जबादारी आहे.

टाटा सन्सच्या संचालक मंडळात एन चंद्रशेखरन २०१६ मध्ये सामील झाले आणि २०१७ च्या जानेवारीत त्यांची अध्यक्षपदी निवड केली गेली. टाटा ग्रुपने एअर इंडियाची खरेदी २०२१ ऑक्टोबर मध्ये २.४ अब्ज डॉलर्स मध्ये केली आहे. चंद्रशेखरन यांनी यापूर्वी टीसीएसचे प्रमुखपद भूषविले आहे. १९८७ मध्ये टीसीएस जॉइन केलेले चंद्रशेखरन मूळचे तामिळनाडू मधले असून त्यांच्या गाठीशी ३५ वर्षे टाटा समूहात काम करण्याचा अनुभव आहे. ‘मॅरेथोन मॅन’ अशी ओळख असलेल्या चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहातील सर्व कंपन्यांचा महसूल वाढलेला पाहायला मिळत आहे.