भगवंत मान शपथविधी- २ कोटी खर्च, पार्किंग साठी ५० एकरातील गहू कापला
पंजाब विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेत येत असलेल्या आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांचा शपथविधी १६ मार्च रोजी होत आहे आणि त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. शहीद भगतसिंग यांचे गाव असलेल्या खटकरकला येथे हा शपथविधी होणार आहे. पंजाब मध्ये प्रथमच राजभवनाऐवजी सार्वजनिक स्थळी मुख्यमंत्री शपथविधी होण्याची घटना घडत आहेच पण भगवंत मान यांनी राज्यातील सर्व नागरिकांना शपथविधी साठी येण्याचे आमंत्रण दिले आहे असे समजते.
या शपथविधीसाठी २ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला जाणार आहे. येणाऱ्या लोकांच्या गाड्या पार्क करण्यासाठी ५० एकरातील गहू पिक कापले गेले असल्याचे समजते. अतिरिक्त मुख्य सचिव ए वेणूप्रसाद यांच्या कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हा शपथविधी सोहळा साजरा करण्यासाठी १०० एकर जमीन स्वच्छ केली गेली असून ४ ते ५ लाख पाहुणे समारंभाला उपस्थित राहतील असा अंदाज आहे. या साठी भगतसिंग स्मारकाजवळची ४५ शेते भाड्याने घेतली गेली आहेत. ५० एकर जागेत मुख्य कार्यक्रम आहे तर ५० एकर जागेत पार्किंगची व्यवस्था आहे.
या शेतातील गहू पिक त्यामुळे कापले गेले असून हा गहू गुज्जर समुदाय पशुखाद्य म्हणून वापरणार आहे. गहू कापणीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून देण्यासाठी प्रती एकर ४६ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन आम आदमी पक्षने दिले आहे. शपथग्रहण मांडवात ४० हजार खुर्च्या लावल्या जात आहेत आणि २५ हजार वाहने पार्क करण्याची सुविधा केली गेली आहे. भगवंत मान यांनी उपस्थित राहणार्या सर्व पाहुण्यांनी म्हणजे पुरुष वर्गाने बसंतीच्या पिवळ्या रंगाची पगडी आणि महिलांनी पिवळा दुपट्टा घालावा असे आवाहन केले आहे.