रिलायंस कॅपिटलसाठी अदानींसह १४ कंपन्यांच्या निविदा

अनिल अंबानी समूहाच्या कर्जात बुडालेल्या रिलायंस कॅपिटल लिमिटेडच्या अधिकृत अधिग्रहणासाठी अडाणी, फिनसर्व, केकेआर, पिरामल फायनान्स, पूनावाला फायनान्स सहित प्रमुख १४ कपन्यांनी रस दाखविला आहे. या कंपन्यांनी रिलायंस कॅपिटलच्या खरेदीसाठी निविदा दाखल करण्याची तयारी केली आहे. रिझर्व बँकेने नियुक्त केलेल्या प्रशासकांनी पूर्वी ११ मार्च पर्यंत निविदा दाखल करण्यासाठी दिलेली मुदत वाढवून २५ मार्च केली असल्याचे समजते.

वरील कंपन्यांसह निविदा दाखल करणाऱ्या कंपन्यांत अर्जवूड, वर्दे पार्टनर्स, मल्टीपल फंड, निप्पान लाईफ, जेसी फ्लॉवर्स, ब्रुकलीन, ओकट्री, अपोलो ग्लोबल, ब्लॅकस्टोन, हिरो फिनकॉर्प यांचा समावेश आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने रिलायंस कॅपिटलचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. आरबीआयने बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी कार्यकारी अधिकारी नागेश्वर राव यांची येथे प्रशासक म्हणून नेमणूक केली होती.

रिझर्व बँकेने दिवाळखोर जाहीर केलेल्या कंपन्यात रिलायंस कॅपिटल्स ही गैरबँकिंग वित्तीय कंपनी तिसरी मोठी कंपनी आहे. ज्या कंपन्यांनी रिलायंस कॅपिटल साठी निविदा भरल्या आहेत, त्यातील बहुतेकांनी पूर्ण कंपनी खरेदीसाठी बोली लावली असल्याचे सांगितले जात आहे.