येथे आहे सलीमच्या अनारकलीचा मकबरा
भारतीय इतिहासात असफल राहिलेल्या आणि तरीही गाजलेल्या प्रेमकहाण्यांचे एक वेगळे स्थान आहे. लैला मजनू, हिर रांझा, शिरी फरहाद अश्या अनेक प्रेमकथा आपण ऐकलेल्या आहेत ज्यात या प्रेमी युगालांचे प्रेम सफल झाले नाही. त्यातील एक आहे सलीम अनारकली यांची प्रेमकहाणी. मुगले आझम या अतिभव्य आणि प्रंचड गाजलेल्या चित्रपटातून ही कहाणी आजही पाहायला मिळते. अनारकली प्रत्यक्षात होती का, ती नक्की कोण होती आणि तिला खरोखरच भिंतीत चिणून मारले गेले का असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. पण या अनारकलीची आठवण म्हणून सम्राट अकबराचा मुलगा सलीम याने बांधलेला एक मकबरा आजही पाकिस्तानच्या लाहोर शहरात आहे. येथे अनारकलीचे अवशेष दफन केले गेल्याचे सांगितले जाते.
सम्राट अकबर यांचा पुत्र आणि राज्याचा वारस सलीम उर्फ जहांगीर हा अनारकलीच्या प्रेमात पडला होता. अनारकली साठी त्याने खुद्द बापाबरोबर युद्ध केले पण त्यात त्याचा पराभव झाला. तेव्हा अकबराने अनारकलीला आमच्या ताब्यात दे, अन्यथा मृत्यूसाठी तयार राहा असा इशारा सलीमला दिला तेव्हा त्याने मृत्यू पत्करण्याची तयारी केली. मात्र अनारकलीने सलीमचा जीव वाचविण्यासाठी स्वतःला अकबराच्या हवाली करून घेतले आणि नंतर तिला भिंतीत चिणून मारण्यात आले अशी ही प्रेमकथा. ही घटना घडली १५९९ साली.
सलीम जेव्हा त्यानंतर ६ वर्षांनी गादीवर आला, तेव्हा त्याने १६१५ साली लाहोर येथे अनारकलीची आठवण म्हणून संगमरवरी मकबरा बांधला. इस्लामी वास्तूकलेचा हा देखणा नमुना असून तो बराचसा ताजमहाल सारखा आहे. आत मोठा हॉल आहे आणि वरच्या मजल्यावर आठ खिडक्या आहेत. येथे अनारकलीची कबर असून त्यावर अल्लाहची ९९ नावे कोरली गेली आहेत.
काही इतिहासकारांच्या मते अनारकलीचे खरे नाव नादिरा बेगम होते आणि ती इराण मधून लाहोरला व्यापारी तांड्यातून आली होती. ती अतिशय सुंदर होती आणि राजपुत्र सलीम तिच्या प्रेमात पडला होता. अन्य काही इतिहासकारांच्या मते अनारकली अकबराच्या हरमची सदस्य होती आणि सम्राटाने तिच्यावर राजपुत्राला अवैध संबंधात फसविण्याचा प्रयत्न केला म्हणून तिला मृत्युदंड दिला गेला होता.