चीनमध्ये पुन्हा करोना उद्रेक, दोन कोटी नागरिक घरात बंद
जगाला करोनाची भेट देणाऱ्या चीन मध्ये करोना विस्फोट झाला असून गेल्या दोन वर्षात सर्वाधिक केसेस आत्ताच्या या विस्फोटात नोंदल्या गेल्या आहेत. सरकारी आकडेवारी नुसार पूर्ण देशात रविवारी ३४०० नवीन करोना केसेस आढळल्या आणि त्यामुळे दोन कोटी नागरिकांना घरात बंद केले गेले आहे. वाहतूक व्यवस्था, येणे जाणे यावर सक्त पहारा लावला गेला आहे. चीनच्या १९ प्रांतात रविवारी आढळलेल्या ३४०० नव्या केसेस पैकी १८०० लोकांमध्ये करोना लक्षणे दिसली आहेत.
द.चीन मधील शेनझेन शहरात १.७५ कोटी नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या कडक सूचना दिल्या गेल्या आहेत. हे शहर चीन मधील टेकहब आहे आणि हॉंगकॉंगला लागून आहे. हॉंगकॉंग मध्ये रविवारी ३२४३० नव्या करोना केसेस सापडल्या आहेत त्यामुळे शेनझेन मध्ये ६६च केसेस सापडल्या असल्या तरी विशेष काळजी घेतली जात आहे. शनिवारी पूर्ण चीन मध्ये १८०७ नव्या केसेस सापडल्या होत्या. अन्य देशांच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी असली तरी बीजिंगच्या व्यापक रणनीती नुसार जीलीन शहरात लॉकडाऊन लावला गेला असून शेजारी राज्याच्या सीमा बंद केल्या गेल्या आहेत. रविवारी १४१२ संक्रमित सापडलेले चांगचून राज्य सर्वाधिक करोना प्रभावित राज्य बनले आहे.