युक्रेन सोडावे लागलेल्या मिस युक्रेनने सांगितली हृदयीची व्यथा

रशियाने युक्रेनवर हल्ले केल्यामुळे युक्रेनमधील २० लाखाहून अधिक नागरिकांना देश सोडवा लागला आणि त्यांनी अन्य देशात आश्रय घेतला आहे. २०१८ मध्ये मिस युक्रेन ठरलेल्या वेरोनिका वर सुद्धा अशीच पाळी आली आणि रशियाचे हल्ले सुरु होण्यापूर्वीच तिने तिच्या ७ वर्षाच्या मुलासह देश सोडला. देश संकटात असताना घाबरून आपल्याला पळावे लागल्याचे वेरोनिका हिने अमेरिकेच्या अॅटर्नी ग्लोरिया एलरेड यांच्या लॉस एंजिलीस मधील कार्यालयात पत्रकारांसमोर बोलताना सांगितले.

वेरोनिकाने आपली कहाणी सांगून सर्व देशांना युक्रेनला मदत करण्याचे अपील केले. वेरोनिका सांगते,मी माझ्या ७ वर्षाच्या मुलासह अन्य लाखो नागरिकांसोबत जेव्हा देश सोडला तेव्हा एकही जागा अशी नव्हती जेथे बॉम्बचे आवाज नाहीत, रॉकेटचा मारा नाही. सायरन सतत वाजत होते. मला अनेक देश फिरत फिरत शेवटी जिनेव्हाला पोहोचता आले पण मुलाला अमेरिकेचा व्हिसा न मिळाल्याने त्याला तेथेच ठेऊन मी अमेरिकेत आले आहे पण मी परत मुलाकडे जात आहे.

युक्रेनी झेंड्याच्या रंगाचा पोशाख घातलेली वेरोनिका सांगते, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आमच्या देशाचे हाल जगापुढे आणण्याचा निर्णय घेतला. आज लाखो युक्रेनी मुले त्यांच्या आयां सोबत स्टेशन, बॉम्बविरोधी आश्रयस्थाने येथे जीव मुठीत धरून जगत आहेत. अनेक गरोदर महिला अश्याच ठिकाणी मुलांना जन्म देत आहेत. मी मायदेशी परतून देशाचे रक्षण करण्यास तयार आहे पण त्यासाठी मला शस्त्रे हवीत.