बायडेन यांच्या फोनकडे सौदी आणि युएईचे दुर्लक्ष

रशिया ऐवजी सौदी अरेबिया कडून कच्चे तेल स्वस्तात खरेदी करण्यासाठी अमेरिकेच्या अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. कच्च्या तेल खरेदीसाठी बायडेन यांनी आखाडी देशांच्या ओपेक मध्ये प्रभाव असणाऱ्या सौदीच्या प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना तसेच युएईचे शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांना फोन केले मात्र या दोघांनी बायडेन यांचे फोन घेतलेच नाहीत असे समोर आले आहे. युक्रेन रशिया युध्द, त्यामुळे रशियावर घातले गेलेले निर्बंध आणि परिणामी कच्च्या तेलाच्या दरात होत चाललेल्या दरवाढीची झळ अमेरिकेला जाणवू लागली आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि त्याचा फटका अमेरिकी अर्थव्यवस्थेला जाणवू लागला असल्याचे सांगितले जात आहे.

बायडेन यांनी सौदी प्रिन्स आणि युएई प्रमुखांशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला दोघांनीही प्रतिसाद दिला नाही. युएईची अमेरिकेने येमेन युद्धात सहाय्य करावे अशी अट असल्याचे सांगितले जात आहे. याला अमेरिकेची तयारी असेल तरच तेलाबाबत चर्चा करण्यास त्यांची तयारी आहे. गेल्या १४ वर्षात तेलाच्या किमती १३० डॉलर्स प्रती बॅरलवर गेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त तेल पुरविण्याची क्षमता फक्त सौदी आणि युएई मध्येच आहे.

या दोन्ही देशांनी प्रतिसाद न दिल्याने बायडेन व्हेनेझुएला मधून कच्चे तेल आणण्याच्या प्रयत्नांत आहेत. व्हेनेझु मध्ये तेलाचे सर्वात मोठे भांडार आहे पण ते पुरवठा करू शकत नाहीत. मंगळवारी बायडेन यांनी तेल किमती कमी करू शकण्यासाठी ते काहीही करू शकत नाहीत आणि हे सर्व पुतीन यांच्या चुकीमुळे घडत असल्याचे वक्तव्य केले आहे.