पंजाबात ‘आप’ चे यश आणि ट्रेंड होताहेत युक्रेनचे झेलेन्स्की

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक मतमोजणीत पंजाब मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने मोठा विजय मिळविला आहे. मतदानोत्तर चाचण्यात आप पक्षाला चांगले यश मिळेल असे संकेत मिळाले होतेच पण आप पक्षाने इतक्या प्रचंड बहुमताची अपेक्षा केली नव्हती. आपच्या या विजयामुळे अचानक युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की ट्रेंड करू लागल्याचे चित्र दिसत आहे. अर्थात आम आदमी पार्टी आणि झेलेन्स्की यांचा दुरान्वये सुद्धा संबंध नाही पण आपच्या यशामुळे सोशल मिडीयावर मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले आपचे भगवंत मान यांची तुलना झेलेन्स्की यांच्याबरोबर केली जात आहे.

युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की, भगवंत मान यांच्या प्रमाणेच कॉमेडीयन होते. झेलेन्स्की युक्रेनच्या प्रसिद्ध कॉमेडी शो ‘केव्हीएन’ मध्ये परफोर्म करत असत. २००३ पर्यंत ते हे काम करत होते. त्यांनी अनेक चित्रपटात सुद्धा भूमिका केल्या आहेत. भगवंत मान यांनीही राजकारणात येण्यापूर्वी राष्ट्रीय दूरदर्शन सह पंजाबी कॉमेडी शो मध्ये काम केले आहे. ‘जुगनू मस्ती भर’हा त्यांचा शो चांगलाच लोकप्रिय ठरला होता.

पंजाब विधानसभा निवडणुकात त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आपने उतरविले होते. आजपर्यंत आम आदमी जनता पार्टी दिल्ली पुरती मर्यादित होती पण आता पंजाब मध्ये बहुमत मिळविल्याने या पक्षाची वाटचाल राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेने सुरु झाली असल्याचे मानले जात आहे. पार्टीने भगवंत मान यांना ‘जनता निवडेल आपला मुख्यमंत्री’ कार्यक्रमाच्या माधमातून निवडले होते. यात फोन, एसएमएस, व्हॉटस अप मेसेज मधून जनतेने मान यांना सर्वाधिक मते दिली होती असे समजते.