लाँचिंग पूर्वीच लखनौ सुपरजायंट्सची जर्सी लिक
आयपीएल २०२२चे सामने लवकरच सुरु होत असून चाहते या वर्षी प्रथमच उतरत असलेल्या लखनौ सुपरजायंट्स आणि गुजराथ टायटन्स बाबत उत्सुक आहेत. या दोन्ही संघांनी एकापेक्षा एक खेळाडू टीममध्ये सामील केले आहेत. या दोन्ही टीम्सच्या जर्सीचा रंग कोणता असेल याची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. अशातच लाँच होण्यापूर्वीच लखनौ सुपरजायंट्सची जर्सी लिक झाली असून त्या संदर्भातला एक व्हिडीओ सोशल मिडियावर सतत व्हायरल होत आहे.
आयपीएल पूर्वी दोन्ही टीम जर्सी आणि थीम सॉंग लाँच करण्याच्या तयारीत मग्न आहेत. सोशल मिडियावर लिक झालेल्या एका व्हिडीओ मध्ये रॅपर बादशाह दिसत असून लखनौचे थीम सॉंग शूट करतानाच हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. यात बादशाहच्या अंगात लखनौची जर्सी दिसत असून आकाशी रंगाच्या या जर्सीवर टीमचा लोगो दिसत आहे.
आरपी संजीव गोयंका यांच्याकडे या टीमची फ्रान्चायझी असून के.एक राहुल या टीमचा कप्तान आहे. या फ्रांचाईझीने २१ खेळाडू खरेदी केले आहेत. त्यातील १८ लिलावात तर तीन रिटेन केले आहेत. आवेश खान हा सर्वात महागडा खेळाडू असून त्याच्यासाठी १० कोटी मोजले गेले आहेत. कप्तान के एल राहुल साठी १७ कोटी मोजले गेले आहेत. लखनौचा पहिला सामना २८ मार्च रोजी गुजराथ टायटन विरुद्ध होणार आहे.