योगी आदित्यनाथानी ३७ वर्षांच्या अंधविश्वासांना दिली तिलांजली

योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकात अभूतपूर्व विजय मिळवून गेल्या ३७ वर्षांपासून रुळलेल्या अनेक अंधश्रद्धांना तिलांजली दिली आहे. पाच वर्षाची एक टर्म पूर्ण करून सलग दुसऱ्या वेळी सत्ता काबीज करण्याचा पराक्रम योगींनी केला आहे आणि त्याचबरोबर सलग दुसऱ्या वेळी एकाच पक्षाला सत्ता मिळत नाही हा अंधविश्वास सुद्धा खोटा असल्याचे सिद्ध केले आहे. राजकीय विश्लेषकांच्याच्या म्हणण्यानुसार योगी यांनी जसे यश मिळविले ते मायावती, मुलायम, नारायण दत्त तिवारी, हेमवतीनंदन बहुगुणा यानाही मिळविता आले नव्हते. पैकी मायावती आणि मुलायम दोन पेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्री बनले पण त्यांना पाच वर्षाची मुदत पूर्ण करता आली नव्हती.

योगी आदित्यनाथ यांनी राजकारणात आल्यापासूनच अनेक रेकॉर्ड नोंदविली आहेत. गोरखनाथ मठाचे उत्तराधिकारी झाल्यानंतर १९९८ मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते तेव्हाच त्यांनी सर्वात लहान वयाचे खासदार होण्याचे रेकॉर्ड केले होते. ४२ व्या वर्षात त्यांनी एकाच क्षेत्रातून पाच वेळा सलग खासदार होण्याची किमया केली असून हि किमया करणारे ते एकमेव खासदार आहेत.

नोयडा येथे भेट देणाऱ्या उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाते हा असाच आणखी एक विश्वास होता. पण योगी यांनी अनेकदा नोयडाला भेट दिलीच पण पुन्हा निवडून येण्याचा पराक्रमही केला आहे. अयोध्येच्या राममंदिरात पूजा करणाऱ्या नेत्याची खुर्ची जाते हा समज सुद्धा योगीनी खोटा ठरविला आहे. १९८८ पासून हे सर्व समज चर्चेत आले होते. विशेष म्हणजे नोयडा भेटीनंतर बहादूरसिंग, नारायणदत्त तिवारी, मुलायमसिंग, कल्याणसिंग यांचे मुख्यमंत्री पद खरोखरच गेले होते आणि अखिलेश, मायावती यांनी त्यामुळे नोयडाला जाण्याचे नेहमीच टाळले होते असे समजते.