सुशांतसिंगला आंतरराष्ट्रीय सन्मान- साजरा होणार ‘सुशांत मून’ दिवस
बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आज या जगात नाही. सुशांतचे अनेक चाहते त्याच्या आकस्मिक मृत्युच्या धक्क्यातून अजूनही सावरू शकलेले नाहीत. मात्र त्यांच्यासाठी एक खास बातमी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुशांतसिंग राजपूत याला खास सन्मान दिला जात आहे. अमेरिकेची लुनार सोसायटी सुशांतसिंग राजपूत याचा जन्मदिवस ‘सुशांत मून’ म्हणून साजरा केला जाणार आहे. २१ जानेवारी २०२३ पासून या उपक्रम सुरु होत असल्याचे समजते.
सुशांतला अंतराळाची विशेष ओढ होती. त्यातही त्याला चंद्राचे फार आकर्षण होते. चंद्र, तारे निरीक्षणासाठी त्याने खास दुर्बीण बसविली होती. इतकेच नव्हे तर चंद्रावर जमीन खरेदी करणारा तो एकमेव बॉलीवूड स्टार होता. इन्स्टाग्रामवर त्याने चंद्रावरच्या त्याच्या प्रॉपर्टीचे फोटो शेअर केले होते. इतकेच नव्हे तर त्याने ‘चंदा मामा दूर के’ हा चित्रपट साईन केला होता ज्यात तो अंतराळवीराची भूमिका साकारणार होता. त्यासाठी नासाने त्याला प्रशिक्षण दिले होते. पण सुशांतच्या अचानक मृत्यूमुळे हा चित्रपट चित्रित होऊ शकला नाही.
अमेरिकन लुनर सोसायटीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर केलेल्या घोषणेनुसार २१ जानेवारी २०२३ पासून हा दिवस ‘सुशांत मून’ म्हणून साजरा होणार आहे. हा ऐतिहासिक वार्षिक इव्हेंट बनेल अशी आशा सोसायटीने व्यक्त केली आहे.