रशियाची भारताला सवलतीच्या दरात क्रूड तेल खरेदीची ऑफर
युक्रेनवर हल्ला करून जगातील सर्वाधिक प्रतिबंध लागलेला देश अशी नोंद करणाऱ्या रशियाने भारताला एक आकर्षक ऑफर दिली आहे. जागतिक प्रतिबंधामुळे त्रासलेल्या रशियन तेल कंपन्या भारताला तेल खरेदीवर २५ ते २७ टक्के सवलत देण्याची तयारी दाखवीत आहेत. बिझिनेस स्टँडर्डच्या रिपोर्ट नुसार युक्रेनवर हल्ला केल्यावर अनेक बँका आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग सिस्टीमने स्विफ्ट बँकिंग सिस्टीम हटविली आहे. त्यामुळे रशियाला अन्य देशांशी व्यापार करणे अवघड झाले आहे. रशिया सरकार नवीन पेमेंट सिस्टीम तयार करत असून ती तयार झाली कि रशिया भारत यांच्यातील तेल व्यापार वाढू शकतो असे सांगितले जात आहे.
रशियाची सर्वात मोठी तेल कंपनी रोसनेफ्टकडून भारत मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करतो. रशियाचे अध्यक्ष पुतीन डिसेंबर मध्ये जेव्हा भारत भेटीवर आले तेव्हा रोसनेफ्ट आणि भारताच्या इंडियन ऑईल कंपनी मध्ये २०२२ अखेर २ कोटी टन तेल पुरविण्याच्या करारावर सह्या झाल्या होत्या. रशियन कंपनी बेन्ट क्रूड ऑईल पूर्वीच्या किमतीवर २५ ते २७ टक्के सवलत देण्याची तयारी दाखवत असून हा अतिशय आकर्षक प्रस्ताव असल्याचे मानले जात आहे.
मात्र या बाबत भारताने अधिक सावधगिरी बाळगली आहे कारण या मुळे जगातील अनेक देश भारतावर नाराज होऊ शकतात. भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक रशियातून आयात तेलाचे पैसे देण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहे आणि त्यावर अनेक चर्चा सुरु आहेत. ब्ल्युमबर्गच्या रिपोर्ट नुसार रशियावर प्रतिबंध लागण्याच्या अगोदरच कच्च्या तेलाचे भाव ११.६० डॉलर बॅरल वर आले होते मात्र तरीही रशियावर प्रतिबंध लागण्याची शक्यता गृहीत धरून ग्राहकांनी या तेलाकडे पाठ फिरविली होती. आता बँकिंग प्रतीबंधांमुळे अन्य देशांना रशियाची व्यापार करणे अवघड बनले आहे.