युक्रेनकडून लढणाऱ्या ब्रिटीश सैनिकांचे होणार कोर्ट मार्शल
रशिया युक्रेन लढाईत ज्या देशांनी युक्रेनला पाठींबा देऊन मदतीचे आश्वासन दिले त्यापैकी कुणीच त्यांचे सैन्य युक्रेन मध्ये पाठविलेले नाही. ब्रिटनने सुद्धा युक्रेन युद्धापासून त्यांच्या सैनिकांनी दूर राहावे असे फर्मान काढले होते मात्र तरीही काही ब्रिटीश सैनिक युक्रेनकडून लढत असल्याचे समोर आले आहे. त्यावर विना परवानगी युक्रेन कडून लढत असलेल्या ब्रिटीश सैनिकाचे कोर्ट मार्शल केले जाणार असल्याची घोषणा ब्रिटन रक्षा मंत्रालयाने केली आहे. ब्रिटीश सेनेतील चार सैनिक युक्रेन कडून लढत असल्याचा दावा केला गेला आहे.
या पार्श्वभूमीवर ब्रिटन रक्षा मंत्रालयाने एक फर्मान जारी केले आहे. त्यानुसार विना परवानगी युक्रेन प्रवास करण्यास बंदी केली गेली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला गेला आहे. ब्रिटनने युक्रेन मध्ये सैन्य पाठविण्यास पूर्वीच नकार दिला होता मात्र अँटी एअरक्राफ्ट व अँटी आर्मर मिसाईल मोठ्या प्रमाणात युक्रेन मध्ये पाठविली आहेत. रक्षा मंत्रालयाने पुढची सूचना येईपर्यत सर्व सेवा कर्मचाऱ्यांना युक्रेन प्रवास बंद केला आहे. सुटीवर असलेले किंवा ड्युटीवर हजर असलेल्या सर्व सैनिकांसाठी हा आदेश लागू आहे.
ब्रिटन ट्रान्स्पोर्ट सचिव ग्रांट शाप्स या संदर्भात म्हणाले, स्वतःच्या मनाने युक्रेन लढाईत सामील झालेल्या ब्रिटीश सैनिकांमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. सरकारने पाठविणे आणि तुम्ही कायदा मोडून जाणे यात फरक आहे. जी मदत ब्रिटीश सरकार करेल ती अधिकृत स्वरूपातच असली पाहिजे या बद्दल सरकार दक्ष आहे.