मेलबर्न क्रिकेट मैदानावर शेन वॉर्नला दिला जाणार अखेरचा निरोप

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्पिन बोलर शेन वॉर्न यांच्या क्रीडा करियर मधील काही शानदार आठवणीचे साक्षीदार असलेल्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर शेन वॉर्नला अखेरचा निरोप दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ३० मार्च रोजी शेनला सार्वजनिक रित्या अखेरचा निरोप देण्याचा कार्यक्रम होणार असल्याच्या वृत्ताला व्हिक्टोरिया राज्याचे डेनियल अँद्र्युज यांनी दुजोरा दिला आहे. शेनचा गेल्या आठवड्यात थायलंड येथे वयाच्या ५२ व्या वर्षी अचानक मृत्यू झाला होता.

डेनियल अँद्र्युज यांनी बुधवारी केलेल्या ट्वीट मध्ये’ शेन वॉर्नला अंतिम निरोप देण्यासाठी जगात मेलबोर्न क्रिकेट मैदानाइतकी अन्य कुठलीच जागा  योग्य नाही असे म्हटले आहे. ते लिहितात, याच मैदानावर त्याने १९९४ मध्ये अॅशेश मालिकेत हॅटट्रिक केली आणि २००६ च्या त्याच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय सिरिजच्या बॉक्सिंग डे टेस्ट मध्ये ७००वा कसोटी बळी घेतला होता. वॉर्न मेलबर्न मध्येच जन्मला आणि तेथेच मोठा झाला.’

वॉर्नचे पार्थिव रविवारी पोस्टमार्टेम केल्यावर थायलंडची राजधानी बँकॉक येथे पाठविले गेले असून तेथून ते ऑस्ट्रेलियाला पाठविण्याची तयारी सुरु आहे. पोस्ट मार्टेममध्ये वॉर्न याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे आणि त्यात काहीही संशयास्पद नसल्याचे दिसून आले असे समुई रुग्णालयाचे उपनिदेशक डॉ. सोन्ग्योंत चायानिनपोरामेट यांनी सांगितले आहे.