क्रिकेट मधील अद्भुत संयोग

क्रिकेटच्या इतिहासात कदाचित प्रथमच असा अनोखा संयोग जुळून आला आहे. एकाच दिवशी, एकाच वेळी, पतीपत्नी आपल्या देशासाठी एकच प्रतिस्पर्ध्याबरोबर वेगवेगळ्या जागी, मैदानावर असल्याची घटना घडली आहे. ही किमया केली आहे ऑस्ट्रेलियन खेळाडू मिशेल स्टार्क आणि त्याची पत्नी एलिसा हिली यांनी.

मिळालेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क पाकिस्तान विरुद्ध पहिली कसोटी रावळपिंडी मैदानावर खेळत होता त्याचवेळी त्याची पत्नी एलिसा हिली ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानविरुद्ध महिला क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये खेळत होती. अर्थात स्टार्क रावळपिंडी येथे खेळत होता तर एलिसा न्यूझीलंडच्या माउंट माउंगमुई मध्ये खेळत होती. विशेष म्हणजे हे दोघेही एकाच वेळी मैदानात होते.

विकेटकीपर व सलामीची फलंदाज असलेल्या एलिसा हिली हिने देशासाठी विनिंग खेळी करून ७२ धावा काढल्या. तिला प्लेअर ऑफ द मॅच घोषित केले गेले. स्टार्क आणि एलिसा यांचा विवाह सहा वर्षापूर्वी झाला आहे. ते दोघेही आपापल्या टीमचे महत्वाचे खेळाडू आहेत. बहुतेक वेळा ते एकमेकांना चिअरअप करण्यासाठी स्टेडीयम मध्ये उपस्थित असतात पण यावेळी मात्र दोघेही वेगवेगळ्या मैदानात होते. ऑस्ट्रेलिया टीमने महिला वर्ल्ड कपच्या या सामन्यात पाकिस्तानचा सात विकेटस नी पराभव केला आहे.