अवघ्या ३८ मिनिटात संपलेली, इतिहासातील छोटी लढाई

युक्रेन रशिया युद्धाचा आज १४ वा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर लढायांचा इतिहास तपासला तर असे दिसते की काही लढाया दीर्घकाळ सुरु राहिल्या तर काही अल्पावधीत संपल्या. युद्ध इतिहासात सर्वात छोटे युद्ध म्हणून नोंद झालेले युद्ध अवघ्या ३८ मिनिटात संपले होते. ब्रिटीश आणि झांझिबार या दोघात हे युद्ध २७ ऑगस्ट १८९६ साली झाले. हे युद्ध सुरु झाले सकाळी ९ वाजून २ मिनिटांनी आणि संपले ९ वाजून ४० मिनिटांनी.

आज टांझानियाचा एक भाग असलेले झांझिबार, त्यावेळी हिंद महासागरातील एक निसर्गसुंदर बेट होते. मसाले, बोटॅनिकल गार्डन्स, किल्ले, गुलाम व्यापार, ऐतिहासिक इमारती या साठी प्रसिद्ध असेलेले हे बेट ब्रिटन पासून १९६३ मध्ये स्वतंत्र झाले. ब्रिटनने या बेटाला १८९० मध्ये गुलाम बनविले होते. स्वातंत्र्यानंतर जानेवारी १९६४ मध्ये हे टांझानियाशी जोडले गेले. त्यापूर्वी सुद्धा सुमारे २०० वर्षे ते पोर्तुगीज लोकांच्या ताब्यात होतेच.

१८९० मध्ये ब्रिटन आणि जर्मनी यांच्यात हेलिगो लँड झांझिबार करार होऊन इस्ट आफ्रिकेच हा द्वीप समूह ब्रिटनच्या अधिकाराखाली आला. तेव्हा ब्रिटीश शासनाने येथे हमद बिन थुवैनी याला सुलतानपद देऊन गादीवर बसविले. त्याने तीन वर्षे राज्य केले पण त्याच्या भाच्याने त्याला विष देऊन त्याचा संशयास्पद मृत्यू घडवून आणला आणि हा भाचा खालिद बिन बर्घाश स्वत सुलतान बनला. त्याने स्वतःच्या रक्षणासाठी ३ हजार सैन्य महालाभोवती ठेवले होते. ब्रिटिशानी त्याला सुलतानपद सोडण्यास सांगितले पण त्याने दाद दिली नाही.

अखेर युद्धाशिवाय अन्य पर्याय राहिला नाही म्हणून ब्रिटीश नौसेनेने या बेटाला २७ ऑगस्ट रोजी घेरले आणि सकाळी ९वा.२ मि. किल्ल्यावर तोफा डागल्या. अवघ्या अर्ध्या तासात किल्ला पडला आणि सुलतान पळून गेला. त्याने जर्मनीच्या दुतावासात आश्रय घेतला. नंतर १९७२ मध्ये त्याचा मृत्यू झाला. या युद्धात सुलतानाचे ५०० सैनिक ठार झाले होते. नंतर ब्रिटीश शासकांनी हमुद याला नवा सुलतान म्हणून नेमले.