रशिया ठरला जगातील सर्वाधिक प्रतिबंध लागलेला देश
युक्रेनवर हल्ला चढवून जगभरात चर्चेत आलेला रशिया आता जगातील सर्वाधिक प्रतिबंधांचा सामना करणारा देश बनला आहे. न्यूयॉर्क येथील प्रतिबंध देखरेख साईट कास्टेलम डॉट एआयने या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार सर्वप्रथम अमेरिका आणि सहयोगी देशांनी २२ फेब्रुवारी रोजी रशियावर अनेक प्रतिबंध घातले. याच्या आदल्या दिवशीच रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेन मधील डोनेक्स आणि लुहांस या विद्रोही भागांना स्वायत्तता दिल्याचे जाहीर केले होते. २४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर सैन्य मोहीम घोषणा केली होती.
त्यानंतर रशियावर १०० विविध प्रतिबंध लावले गेले. २२ फेब्रुवारी पूर्वी रशियावर २७५४ प्रतिबंध होते आणि युक्रेनवर हल्ला केल्यावर आणखी २७७८ प्रतिबंध लावले गेले. दोन्ही मिळून ही संख्या ५५३२ होते. या अगोदर इराण हा सर्वाधिक प्रतिबंध लागलेला देश होता. इराणवर विविध देशांनी ३६१६ प्रकारचे प्रतिबंध लावले असून आता रशियाने इराणला मागे टाकले आहे.
ज्या देशांनी रशियावर प्रतिबंध लावले त्यात स्वित्झर्लंड ५६८, युरोपीय संघ ५१८, कॅनडा ४५४, ऑस्ट्रेलिया ४१३, अमेरिका २४३, ब्रिटन ३५ व जपान ३५ यांचा समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी रशियाकडून तेल व वायू खरेदीवर नुकताच प्रतिबंध लावला आहे. रशियाच्या वित्तीय क्षेत्रांवर अनेक कडक प्रतिबंध लावूनही उर्जा निर्यातीतून रशियात रोख पैसा येतो आहे असेही म्हटले जात आहे.