बॉलीवूडवर या उत्तरप्रदेशीय कलाकाराचे पूर्वीपासून राज्य

पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकींची मतमोजणी उद्या सकाळी सुरु होत आहे. सर्व देशाचे लक्ष प्रामुख्याने उत्तर प्रदेश निकालांकडे आहे. उत्तर प्रदेशात कुणाचे सरकार येणार याचे चित्र उद्या सायंकाळ पर्यंत स्पष्ट होईलच पण महानगरी मुंबईच्या बॉलीवूड इंडस्ट्रीवर उत्तर प्रदेशीय कलाकार दीर्घ काळ राज्य करत आहेत असे नक्कीच म्हणता येईल. कोण कोण आहेत हे कलाकार?

बॉलीवूड शेहेनशाह आणि बिगबी नावाने आपला दबदबा निर्माण केलेले अमिताभ बच्चन यांचा यात पहिला नंबर आहे. प्रयागराज येथे जन्म झालेल्या बिगबी यांचे प्राथमिक शिक्षण येथेच झाले आणि नंतर त्यांनी दिल्ली मध्ये कॉलेज शिक्षण घेतले. १९६९ मध्ये सात हिंदुस्थानी चित्रपटातून बॉलीवूड मध्ये डेब्यू करणारे अमिताभ यांना आजही बॉलीवूड मध्ये तोड नाही असे म्हणावे लागते.

उत्तरप्रदेशातील अयोध्या कोणता राजकीय पक्ष जिंकणार याची उत्सुकता मोठी असली तरी अयोध्येत जन्मलेल्या अनुष्का शर्मा हिने बॉलीवूड कधीच जिंकले आहे. बंगलोर मध्ये लहानाची मोठी झालेली अनुष्का मॉडेलिंग साठी मुंबईत आली होती. रब ने बना दी जोडी मधून बॉलीवूड डेब्यू करणारी अनुष्का आज आघाडीची अभिनेत्री बनली आहे. आंतरराष्ट्रीय स्टार अशी ओळख असलेली प्रियांका चोप्रा झारखंड मध्ये जन्माला आली असली तरी तिचे सर्व शिक्षण लखनौ आणि बरेली येथे झाले आहे. २०२० मध्ये मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड ठरलेल्या प्रियांकाने २००३ मध्ये ‘ द.हिरो’ मधून बॉलीवूड पदार्पण केले आहे.

आजची आघाडीची अभिनेत्री दिशा पाटनी चा जन्म बरेलीचा आहे. लखनौ मधून पदवी घेतल्यावर २०१३ मध्ये फेमिना मिस इंडिया स्टेट लेव्हल २ नंबरवर आलेल्या दिशाने ‘ एमएस धोनी, द अनटोल्ड स्टोरी’मधून बॉलीवूड पदार्पण केले आहे. मिस युनिव्हर्स लारा दत्ता गाझियाबादची असून बॉलीवूड मध्ये प्रसिद्धी मिळविल्यावर आता तिने बॉलीवूड संन्यास घेतला आहे.

मुझफ्फरनगरच्या बुधना येथे जन्मलेल्या नवाजुद्दिन सिद्दिकीने बॉलीवूड मध्ये त्याच्या नावाचा डंका वाजविला आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून शिक्षण घेतलेल्या नवाजुद्दिनने १९९९ मध्ये सरफरोश चित्रपटात पहिली भूमिका केली होती. आज तो आघाडीचा कलाकार आहे. विनोदी अभिनेता राजपाल यादव शहाजहांपूरचा रहिवासी असून त्यानेही १९९९ मध्येच बॉलीवूड डेब्यू केला आहे.